नाशिक : नितीन रणशूर
कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा-महाविद्यालये गजबजली आहेत. कोरोनामुळे काही प्रमाणात आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबल्याने आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आकडा दोन लाखांच्या घरात गेला आहे. त्यात निवासी, बःहिस्थ आणि विनासवलत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी शाळांमध्ये 1 लाख 90 हजार विद्यार्थी प्रवेशित होते.
राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत 499 शासकीय आश्रमशाळा चालविल्या जात असून, त्यामध्ये लाखो विद्यार्थी अभ्यासक्रमाचे धडे गिरवितात. सुमारे तीनशेहून अधिक आश्रमशाळा विविध दुर्गम भागांत आहेत. शासकीय आश्रमशाळा निवासी असल्याने शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. आदिवासी उपाययोजनेंतर्गत निधीदेखील मंजूर करून शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सर्व प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यावर विभागाचा भर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असते.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. पालकांनीही आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना नकार दिल्याने नवीन प्रवेशाला काही प्रमाणात ब—ेक लागला होता. आता शाळा-महाविद्यालये पूर्वपदावर आल्याने आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढू लागली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, 499 शाळेत 1 लाख 97 हजार 872 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यात मुलांची संख्या 94 हजार 16, तर मुलींची संख्या 1 लाख 3 हजार 856 इतकी आहे. यंदाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
प्रवेशितांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय
विनासवलत प्रवर्गातून प्रवेश…
नाशिक अप्पर आयुक्तालयातील 214 शाळांमध्ये 91 हजार 370 विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यामध्ये 68 हजार 627 निवासी, 13 हजार 87 ब:हिस्थ, तर 9 हजार 656 विनासलवत विद्यार्थी आहेत. ठाणे अपर आयुक्तालयाच्या 127 शाळांमध्ये 55 हजार 582 विद्यार्थी, अमरावती अपर आयुक्तालयातील 83 शाळांमध्ये 29 हजार 16, तर नागपूर अपर आयुक्तालयातील 75 शाळांमध्ये 21 हजार 494 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, निवासी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरविल्या जातात. ब:हिस्थ विद्यार्थ्यांना केवळ पोषण आहार दिला जातो. तर कर्मचार्यांसह इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विनासवलत प्रवर्गातून प्रवेश देण्यात येत असल्याचे आदिवासी विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अपर आयुक्तालयातील शाळा…
नाशिक – 214, अमरावती – 83, ठाणे – 127, नागपूर – 75.
आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्या याप्रामाणे…
कार्यालय शाळा प्रवेशित
नाशिक 39 18,334
कळवण 41 20,558
धुळे 22 9,308
नंदुरबार 32 13,273
तळोदा 42 18,263
यावल 17 5,437
राजूर 21 6,197
सोलापूर 03 719
पेण 14 5,317
जव्हार 30 18,733
घोडेगाव 23 5,854
शहापूर 23 9061
डहाणू 34 16,168
मुंबई 00 00
औरंगाबाद 08 2,699
कळमनुरी 05 1,891
पांढरकवडा 19 3518
अकोला 08 2766
धारणी 20 9860
पुसद 07 2402
किनवट 16 6020
अहेरी 11 2054
भामरागड 08 2607
भंडारा 01 246
चंद्रपूर 08 1897
चिमुर 04 1034
देवरी 11 3631
गडचिरोली 24 7,650
नागपूर 06 1083
वर्धा 02 292
एकूण 499 शाळा
प्रवेशित विद्यार्थी 1,97,872 आहे.