भोसरी रुग्णालयातील प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया विभागाला राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक गुणवत्ता पुरस्कार | पुढारी

भोसरी रुग्णालयातील प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया विभागाला राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक गुणवत्ता पुरस्कार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागामधील गुणवत्ता वाढ करणे, यासाठी केंद्र शासनाच्या ‘लक्ष्य’ (एलएक्यूएस- एचवायए) या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया विभागाला राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. असे प्रमाणपत्र प्राप्त करणारी पिंपरी-चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

भोसरी रुग्णालयातील प्रसूतीकक्ष व प्रसूती शस्त्रक्रिया विभागाने लक्ष्य उपक्रमांतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचना व मानकांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता केली आहे. या विभागामध्ये दिल्या जाणार्‍या आरोग्य सुविधांची गुणवत्ता अधिक आहे. येथे प्रत्येक माता व नवजात बालकांची सर्वोत्तम पद्धतीने काळजी घेतली जाते. त्यामुळे रुग्णालयास गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहेे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभाग व भोसरी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे, महिला आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना गडलिंगकर, डॉ. चैताली इंगळे, डॉ. सुजाता गायकवाड, डॉ. अर्चना गांधी, डॉ. विकल्प भोई, असिस्टंट मेट्रन वत्सला वाझे, अनुपम वेल्हे यांचा समावेश आहे.

थेरगाव रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करणार
किडनीच्या आजारांनी त्रस्त गरजू व गरीब रुग्णांकरिता थेरगाव रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी शिशु अतिदक्षता विभागदेखील सुरू करण्यात येणार आहे. शहर अ‍ॅनिमियामुक्त करण्यासाठी ‘मिशन अक्षय’ योजना अतिशय परिणामकारक ठरत आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत 18 वर्षे वयोगटावरील सर्व महिलांची तपासणी करण्यात आली. सर्व महिला, माता, गरोदर महिलांना सोनोग्राफी, एक्स-रे, सेवा, समुपदेशन, औषधोपचार आदी सेवा मोफत देण्यात आल्या.

काय आहे ‘लक्ष्य’ उपक्रम
प्रसूतीचा सुरक्षित व आनंददायी अनुभव प्रत्येक गर्भवती महिलेला मिळावा, अशी तिची व तिच्या कुटुंबाची इच्छा असते. यासाठी देशातील मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘लक्ष्य’ हा उपक्रम सुरू केला आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांतील प्रसूतीकक्ष व प्रसूती शस्रक्रिया विभागामधील सुविधांची गुणवत्ता सुधारावी. प्रत्येक स्त्रीला उच्च दर्जाची सेवा मिळावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Back to top button