जळगाव, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या बोदवड येथील चार नगरपंचायतीच्या चार जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून निवडणुकीचा कार्यक्रमही घोषीत करण्यात आला आहे.
बोदवड येथील नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. यात शहरातील चार प्रभागांची निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे स्थगित करण्यात आली होती. यासाठीचे आरक्षण उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी आरक्षण जाहीर केले.
यानुसार बोदवडच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वसाधारण व प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वसाधारण महिला या प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रांताधिकार्यांनी निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला. यामध्ये २९ डिसेंबर ते ३ जानेवारी २२ पर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर करावयाचे आहेत. १ व २ जानेवारीला दोन दिवस सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत. तसेच नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी ४ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येईल.
माघारीसाठी अंतिम मुदत १० जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया १८ जानेवारीला होईल. तर मतमोजणी १९ जानेवारीला करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यामुळे बोदवड येथे आता चार जागांसाठी रणधुमाळी सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा
व्हिडिओ पहा : …आणि त्या दिवसानंतर शाहू महाराजांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला