नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; द 'काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहण्यासाठी गळ्यात भगव्या शाली घालून आलेल्या काही महिलांच्या शालींवर चित्रपटगृह व्यवस्थापनाने आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला.
कॉलेज रोड येथील एका मल्टिप्लेक्समध्ये 'काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहण्यासाठी महिलांच्या एका समूहाने एकत्रित तिकिटे काढली होती. या समूहाच्या ओळखीसाठी त्यातील सर्व महिलांनी गळ्यात भगव्या शाली परिधान केल्या होत्या. चित्रपटगृह व्यवस्थापनाने त्यांना शाली बाहेर जमा करून सिनेमा पाहण्यास सांगितले व सिनेमा संपल्यानंतर पुन्हा शाली घेण्याची विनंती केली. त्यानुसार महिलांनी सिनेमागृहाबाहेर शाली ठेवल्या व चित्रपट पाहिला. तेव्हा याविषयी कोणताही वाद झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र, चित्रपट सुरू असताना ही माहिती बाहेर पसरल्याने काही युवक सिनेमागृहात आले. सिनेमा संपल्यावर त्यांनी महिलांकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर काहीसा गोंधळ निर्माण झाला. महिलांनी 'जय श्रीराम' अशी घोषणाबाजी केल्याचेही कळते. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत प्रकरण समजून घेतले व वादावर पडदा टाकला.