

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज दीपनगर प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करुन, मयत कर्मचाऱ्याच्या परिवारास भरपाईची मागणी केली आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचा संताप अनावर होऊन दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी लागलीच धाव घेत कर्मचाऱ्यांना हटविले आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दीपनगर प्रकल्पात विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून आधीच कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन सुरु असताना एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी १०.३० वाजता नवीन ६६० प्रकल्पाच्या गेटवर आंदोलकांनी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले होते.
दीपनगर प्रकल्पातील कर्मचारी शैलेंद्र यादव (वय ३४, मूळ रा. बिहार) हा इंडवेल कंपनीत काम करीत होता. आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी (दि. ४) रोजी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. त्याचे निधन झाल्यानंतर त्याचा मृतदेह बिहारकडे रवाना करण्यात आला. मात्र, नियमानुसार या कर्मचाऱ्याच्या वारसाला सर्व भरपाई देण्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.
कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
दीपनगरात कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अप्रिय घटना टाळण्यासाठी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे तसेच कर्मचारी सुरक्षिततेबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास योग्य ती भरपाई द्यावी, तसेच अन्य प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. मृत कर्मचाऱ्याचा मृतदेह पुन्हा आणावा म्हणून कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे आग्रह धरला. चार तास उलटूनही अधिकारी न आल्याने कामगार अधिकच संतप्त झाले व त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी किरकोळ दगडफेक करत, वाहनेही फेकण्यात आली.
भेल जनरल मॅनेजर संजय गोस्वामी
भेलचे जनरल मॅनेजर यांना घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, भेल कंपनीने बॉयलर बनवण्याचा सब कॉन्ट्रॅक्ट इंडवेल कंपनीला दिला आहे. या कंपनीने बॉयलर बनवण्यासाठी सुद्धा पेटी कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिला असून त्या कंपनीचा हा कामगार होता. काल रात्री त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते. तसेच कामगारांचा मृतदेह त्याच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पगार होत नसल्याच्या आरोपवर ते म्हणाले की, दर महिन्याला नियमित पगार होतात, आम्ही सर्व कागदपत्र बघितल्यानंतर कंपन्यांना पैसे देतो. आतमध्ये येण्याची परवानगी ही महाजनको देते. त्यांनी पास दिल्यानंतरच सर्व कामगार व ठेकेदार काम करण्यासाठी आतमध्ये येऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्याकडे पैसे नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्यास त्यावर ते म्हणाले की, याची सर्व चौकशी आम्ही करीत आहोत.
मुख्य अभियंता विवेक रोकडे
यापूर्वी २३ तारखेला गेटवर एक बैठक झाली होती. त्यामध्ये चर्चेनंतर असे ठरले होते की. यापुढे सर्व पगार नियमित होतील आणि सर्व कामगारांचे पगार झालेले आहेत. कोरोनामुळे या सहाशे साठ मेगावॅट प्रकल्पाच्या कामाला उशीर होत आहे. याकरता केंद्र सरकारने पूर्वी सहा महिनेनंतर तीन महिने असा एकूण नऊ महिन्याचा अवधी वाढवून दिल्याचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?