Corona In Cricket : RCB च्या ‘या’ हा स्टार खेळाडूला कोरोनाची लागण! | पुढारी

Corona In Cricket : RCB च्या ‘या’ हा स्टार खेळाडूला कोरोनाची लागण!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Corona In Cricket : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला कोरोनाची लागण झाली आहे. मॅक्सवेल हा बिग बॅश लीगमधील मेलबर्न स्टार्सचा कर्णधार आहे. मॅक्सवेल हा मेलबर्न स्टार्स संघातील १३ वा खेळाडू आहे ज्याला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मेलबर्न स्टार्सचे १२ खेळाडू आणि ८ सपोर्टिंग स्टाफ कोरोना पॉझिटीव्ह अढळले होते. ऑस्ट्रेलियात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता क्रिकेटर्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ माजली आहे.

मेलबर्न स्टार्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आमच्या संघाचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलची मंगळवारी अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे पुढे आम्ही मॅक्सवेलची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्याचा अहवाल अजून मिळालेला नाही. पण काळजीसाठी त्याला आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. यापूर्वी, ब्रिस्बेन हीट संघाच्या खेळाडूंची रॅपिड अँटीजेन चाचणी केली होती. त्यात काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. याच कारणामुळे बिग बॅश लीगच्या तीन सामन्यांचे वेळापत्रक शेवटच्या क्षणी बदलावे लागले होते. (Corona In Cricket)

तथापि, मेलबर्न स्टार्ससाठी दिलासा देणारी बातमी अशी आहे की, अॅडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस आणि नॅथन कुल्टर-नाईल यांच्यासह सुमारे १० खेळाडूंचा ७ दिवसांचा आयसोलेशन कालावधी संपवणार आहे. त्यामुळे ते पुढील सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. सोमवारी झालेल्या सामन्यात मेलबर्न स्टार्सला स्थानिक खेळाडूंना मैदानात उतरवावे लागले होते. या सामन्यात त्यांचा ५ गडी राखून पराभव झाला. (Corona In Cricket)

ॲशेस मालिकेवरेही कोरोनाचे सावट…

ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू ग्लेन मॅकग्रा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे तो आता सिडनी कसोटीत समालोचन करताना दिसणार नाही. मॅकग्रा या मालिकेतील ब्रॉडकास्ट चॅनलच्या कॉमेंट्री पॅनेलचा भाग होता. आजपासून सिडनी कसोटी सामना सुरू झाला आहे. पण, मॅकग्राला कोरोनाची लागण झाल्याने तो आयसोलेशनमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज ट्रॅव्हिस हेडलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सिडनी कसोटीत तो संघातून बाहेर आहे. त्यांच्या जागी उस्मान ख्वाजाला संघात स्थान देण्यात आले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओलाही कोरोनाची लागण झाली आहे

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकली देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हॉकली यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळला असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याचेही बोर्डाने सांगितले आहे.

Back to top button