येवला, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारने कर्नाटक मधील काही जिल्ह्यांवर दावा दाखल केला आहे. महाराष्ट्र सरकारला कर्नाटकची एक इंच देखील जमीन दिली जाणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई येथे केले. दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, कर्नाटकमध्ये आताही मराठी भाषकांवर अन्याय सुरू असून महाराष्ट्रमध्ये सर्व भाषाप्रांतांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. तसेच महाराष्ट्रमध्ये सर्व भाषांचा आदर केला जातो. मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही त्या वेळेस खूप प्रयत्न केले आणि आताही प्रयत्न करत आहोत. तत्कालीन महाजन आयोगाने 850 गावांसह निपाणीचा समवेश करत महारष्ट्राला देण्याचे मान्य केले होते. मात्र महाराष्ट्रातील तत्कालीन नेत्यांनी जोपर्यंत बेळगाव महाराष्ट्रात येणार नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
तसेच, सीमा वादाच्या आंदोलनप्रसंगी अनेक आंदोलकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. तर मी स्वतः मराठी भाषिकांसाठी तुरुंगवास भोगला आहे. याची आठवण भुजबळांनी करून दिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे काहीतरी बोलले तरी सीमा वादातील गावांचा निर्णय मात्र सुप्रीम कोर्ट घेणार आहे, असे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा