नाशिक : विद्यार्थिनी, महिलांना अल्पदरावर कर्जसुविधा; मामकोच्या योजनांविषयी अध्यक्ष भोसले यांची माहिती

मालेगाव : मामको बँकेची माहिती देताना अध्यक्ष राजेंद्र भोसले. समवेत संचालक मंडळ.
मालेगाव : मामको बँकेची माहिती देताना अध्यक्ष राजेंद्र भोसले. समवेत संचालक मंडळ.

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा : शहराची अर्थवाहिनी असलेल्या दि मालेगाव मर्चंट को. ऑप बँकेला गत आर्थिक वर्षात पाच कोटी 49 लाखांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी दिली. सभासदांना 10 टक्के लाभांश वाटपाची शिफारस रिझर्व्ह बँकेकडे झाली आहे. दरम्यान, अत्याधुनिकतेची कास धरत भविष्यात विद्यार्थिनींना शिक्षणासाठी, तर महिलांना उद्योगासाठी अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे विचाराधीन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

'मामको'च्या सभागृहात मंगळवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. सर्व वजावट जाता बँकेने निव्वळ दोन कोटी 11 लाख 18 हजारांना नफा मिळवला आहे. बँकेने विक्रमी 273 कोटी 96 लाखांच्या ठेवी संकलित केल्या असून, 143 कोटी 83 लाखांचे कर्जवाटप केले आहे. कोरोना आदी प्रतिकूल परिस्थितीतही नियमित वसुलीच्या माध्यमातून नफा टिकविण्यात बँकेला यश आले. बँकेचा एकूण निधी 36.78 कोटी, तर गुंतवणूक 156.80 कोटींची झाली. गतवर्षाच्या तुलनेत 18.58 कोटींची वाढ झाली आहे. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर) 15.58 टक्के इतके आहे. थकबाकी 16.41 कोटी इतकी कमी होऊन निव्वळ एनपीएचे प्रमाण बँकेच्या इतिहासात प्रथमच 5.83 टक्केपर्यंत कमी करण्यात यश आल्याने बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे भोसले यांनी नमूद केले. सोने तारणावर सर्वांत कमी दराने (9 टक्के) कर्ज देणारी मामको बँक ठरली आहे. लहान व्यावसायिकांसाठी 25 हजारांचे विनातारण कर्ज वाटप योजनेला प्रतिसाद मिळाल्याने ही मर्यादा आता 50 हजारांपर्यंत वाढविली आहे. जेणेकरून सावकारीपासून सुटका होईल, असे ते म्हणाले.

काटकसरीचे धोरण अवलंबत बँक शाखांना कायापालट केला जात आहे. संगमेश्वरमध्ये स्वमालकीची जागा खरेदी करणे, मनमाड चौफुली अथवा चाळीसगाव फाटा येथे जागा मिळाल्यास त्याठिकाणी टिळकवाडीची शाखा स्थलांतरित करण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष गौतम शहा, संचालक शरद दुसाने, सतीश कासलीवाल, दादाजी वाघ, अ‍ॅड. संजय दुसाने, अ‍ॅड. भरत पोफळे, सतीश कलंत्री, भिका कोतकर, मंगला भावसार, विठ्ठल बागूल, जनरल मॅनेजर कैलास जगताप आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news