Dhule : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यातील पाचमौली येथून एप्रिल महिन्यात एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्यात आले होते. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आता वाढीव कलम लावण्यात आले आहे. त्यानुसार पीडितेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या आणखी एकाला सहआरोपी करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाचमौली येथील अल्पवयीन मुलीस राकेश भाऊसाहेब निकम वाजगाव, ता. देवळा, जि. नाशिक याने (दि. १० एप्रिल २०२२) रोजी रात्री ११ च्या सुमारास लग्नाचे आमिष दाखवित पळवून नेले होते. तिला देवळा येथील एका हॉटेलवर ठेवण्यात आले होते. दरम्यान २९ एप्रिल रोजी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा पोलिसांत दाखल झाला होता. तथापि, पीडित मुलीने पोलिसांत जबाब देत १० एप्रिल ते २७ एप्रिल २०२२ दरम्यान देवळा येथील हॉटेलवर राकेश निकम याने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले.
या फिर्यादीची दखल घेत राकेश निकमवर वाढीव भादंवि कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय या सर्व प्रकरणात राकेशला मदत करणारा देवळा येथील समाधान यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि. हनुमंत गायकवाड करीत आहेत.

