छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा अंतिम आराखडा सादर | पुढारी

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा अंतिम आराखडा सादर

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे सुमारे 269 कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा अंतिम आराखडा बांधकाम विभागाच्या वतीने प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात आला आहे. नुकतेच या आराखड्याचे प्रेझेंटेशन वढू बुद्रुक व तुळापूर येथील ग्रामस्थांसाठी पुणे येथे करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता बी. एन. बहीर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, अभियंता मयूर सोनवणे यांनी या वेळी ग्रामस्थांच्या सूचनाही लक्षात घेतल्या. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासह श्रीक्षेत्र वढू बुद्रुक, तुळापूरच्या सर्वांगिण विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यानंतर या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकासह वढू- तुळापूर यांच्या कनेक्टिविटीसाठी रस्ते व पूल असा सुमारे सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे. संभाजी महाराजांची दोन्ही स्मृतीस्थळे नदीमार्गे बोटीने जोडण्याचा प्रस्ताव आहे. विकासकामांसाठी एकूण 343 कोटींहून अधिकचा निधी मिळणार असल्याने श्रीक्षेत्र वढू – तुळापूरचा कायापालट होणार असल्याचे आ. अशोक पवार यांनी सांगितले.

हा आंतरराष्ट्रीय आराखडा तयार करण्यासाठी बांधकाम विभागाच्या वतीने आयडिया कॉम्पिटिशन नावाने निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये सहा एजन्सीज सहभागी झाल्या होत्या. यानंतर क्रिएटिव्ह एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड यांचा आराखडा मान्य करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी सुमारे 65 फूट उंचीचे छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळे उभे करण्यात येणार आहेत. योद्धे व अभ्यासक संभाजी महाराज ही कल्पना वापरून हे पुतळे उभे करणार आहेत. या स्मारकामध्ये प्रवेश करताच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमधून इतिहास मांडला जाणार आहे.

वढू बुद्रुक विकास आराखडा वैशिष्ट्ये
1. स्मारकाची संरक्षक भिंत.
2. स्मारक मुख्य प्रवेशद्वार.
3. इन्व्हिझिबल शिल्प
4. आच्छादित कॉरिडॉर.
5. व्ह्यूइंग पॉईंट.
6. छत्रपती संभाजी महाराज समाधी.
7. कवी कलश समाधी.
8. देऊळ.
9. मेडिटेशन हॉल.
10. सदर बाजार.
11. स्मारकाचे एक्झिट द्वार.
12. प्रसाधन गृह.
13. तिकीट घर.
14. वाहनतळ.
15. प्रशासकीय इमारत व संग्रहालय.

तुळापूर विकास आराखडा
1. छत्रपती संभाजी महाराज समाधी.
2. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट
3. व्ह्यूइंग गॅलरी
4. प्रशासकीय इमारत व संग्रहालय.
5. अँफिथिएटर.
6. सदर बाजार.
7. वाहनतळ.
8. स्वच्छतागृह
9. प्रवेशद्वार

Back to top button