पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
कांद्याची आवक वाढल्याने येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत भाव घसरून क्विंटलचा भाव 800 रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी आणणारा कांदा आता शेतकर्यांच्या डोळ्यांतून पाणी आणत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर 2 हजार 500 ते 4 हजार रुपये क्विंटलपर्यंत झेपावले होते. यंदा हेच दर प्रतिक्विंटल 700 ते 800 रुपयांवर आले आहेत.
साक्री तालुक्यातील अनेक शेतकरी कांद्याची लागवड करतात. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता यंदाही कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. पण, ही अपेक्षा आता फोल ठरली. मजुरी, बियाणे, खते, औषधांच्या दरात वाढ झाल्याने शेतकर्यांचा कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च झाला आहे. दुसरीकडे दर घसरल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे. चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा आता सडण्याचा धोका असल्याने शेतकर्यांनी मिळेल त्या भावात कांदा विक्रीस प्राधान्य दिले आहे. पिंपळनेर येथील कांदा मार्केट साक्री तालुक्यातील मोठे मार्केट मानले जाते. या ठिकाणी सामोडे, चिकसे, शिरवाडे, जेबापूर, रोहन, शेणपूर, धाडणे आदी भागांतील शेतकरी कांदे विक्रीसाठी या ठिकाणी येतात.