नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी टोल बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यावर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी, इशारा देण्यापेक्षा भुजबळांनी त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद असतानाच टोल बंद करायला हवा होता, असा टोला लगावला. दरम्यान, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध असल्याने नार्वेकर सध्या शिवसेनेत नाराज असल्याचा दावा ना. महाजन यांनी केला.
नाशिक दौर्यावर असलेल्या ना. महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ पालकमंत्री असताना टोल बंदचा निर्णय घेतला असता, तर बरे झाले असते, अशी टीका करत खड्ड्यांमुळे मलादेखील रेल्वेनेच इकडे यावे लागले, असे त्यांनी सांगितले. राज्यात बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण चर्चा केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा झाली असून, लवकरच रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा ना. गिरीश महाजन यांनी केला आहे. शिवसेनेत मिलिंद नार्वेकर नाराज असल्याची चर्चा असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिवसेनेत कोण नेते राहतील आणि कोण नाही, हे आत्ताच सांगता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे दीपोत्सवात एकत्र आल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, याकडे राजकारण म्हणून पाहता येणार नाही आणि राजकारणत काहीच अशक्य नसते. मनसे आणि भाजप युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगत मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होण्याचे संकेतही दिले.