गुरवपिंप्री लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो

गुरवपिंप्री लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो
Published on
Updated on

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री लघु पाटबंधारे तलाव ओव्हरप्लो झाला आहे. तलावाच्या सांडव्याद्वारे पाणी खळखळून वाहत आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या धो धो पावसामुळे हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तलाव भरल्याने शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्न मिटला असला, तरी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

चांदे बुद्रुक, मुळेवाडी, गुरवपिंप्री परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली असल्याने परिसरातील सर्वच तलाव भरत आले आहेत. गुरवपिंप्री येथे एकूण छोटे-मोठे एकूण चार तलाव असून, हे सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शासनाने मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

गुरवपिंप्री तलावांतर्गत गुरवपिंप्री मधील शेतजमीन ओलिताखाली येते, 1955 मध्ये या तलावाची निर्मिती झाली आहे. पावसाच्या कमी प्रमाणामुळे निर्मितीपासून तलाव भरण्याच्या वेळा कमी आहेत. मात्र, ऑक्टोबर महिन्यात चांदे परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. गुरवपिंप्री तलावाच्या चारीची दुरुस्ती होण्याची गरज असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. परिसरातील शेती पावसावर आधारित असल्याने दरवर्षी पिण्याचा पाणीप्रश्न उदभवत असतो. मात्र, यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र, सततच्या पावसाने हा संपूर्ण हंगामाच वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त केली जात आहे.

गुरवपिंप्री तलावाची क्षमता 136 दशलक्ष घनफूट असून, उपयुक्त पाणीसाठा 111 दशलक्ष घनफूट आहे. मृतसाठा 25 दशलक्ष घनफूट असून, लाभक्षेत्र 1440 हेक्टरचे आहे. लागवडीलायक सिंचनक्षेत्र 1152 हेक्टर आहे. सिंचन क्षेत्र 520 हेक्टर आहे.

गुरवपिंप्रीमध्ये एकूण चार तलाव असून चारही तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. शेतीचा, पिण्याचा पाणीप्रश्न मिटला असला, तरी पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे, सरकारने शेतकर्‍यांना तात्काळ मदत जाहीर करावी.
                                                – सागर गंगावणे, उपसरपंच, गुरवपिंप्री

गुरवपिंपरी तलाव शंभर टक्के भरून वाहू लागला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या तलावामुळे चांदे बुद्रुक, गुरवपिंप्री, मुळेवाडी, या आसपासच्या गावातील शेतकरी सुखावला आहे. तसेच पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.
                                              – पूजा प्रकाश सूर्यवंशी, सरपंच, चांदे बुद्रुक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news