वनगुन्हेगारीचे ’नाशिक कनेक्शन’ ; राज्य वन्यजीव गुन्हे कक्षाचे नेटवर्क विस्तारण्याची गरज

वनगुन्हेगारीचे ’नाशिक कनेक्शन’ ; राज्य वन्यजीव गुन्हे कक्षाचे नेटवर्क विस्तारण्याची गरज
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून वन्यजीवांच्या शिकारी, त्यांच्या अवयवांचा अवैध व्यापार व तस्करी तसेच वनसंपदेच्या चोरट्या वाहतुकीचे नाशिक कनेक्शन वारंवार समोर येत आहे. स्थानिक शिकार्‍यांना हाताशी धरून तस्करांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जिल्हाभर फोफावलेली वनगुन्हेगारी मोडीत काढण्यात स्थानिक वनविभागाला अपयश आले आहे. विशेषत: नाशिक पश्चिम वनविभागात वनगुन्हेगारांवर वचक न राहिल्याने त्यांना मोकळे रान मिळत आहे.

नाशिक जिल्हा पश्चिम व वायव्य दिशेला गुजरातच्या नवसारी, वलसाड व डांग या जिल्ह्यांपर्यंत विस्तारला आहे. तर नाशिक जिल्ह्याची सीमा धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत. नाशिकच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आढळून येते. त्यामुळे वनगुन्हेगारांची वक्रदृष्टी याच परिसरात असते. त्यातच नाशिक वनवृत्तातील संवेदनशील समजल्या जाणार्‍या हरसूल, पेठ, सुरगाणा, उंबरठाण आदी वनपरिक्षेत्रांपैकी अनेक ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नसल्याने वनगुन्हेगारी रोखण्याला मर्यादा आल्या आहेत.
गेल्या आठवड्यात शहापूर वनविभागाने सिन्नर-इगतपुरी रस्त्यावर कारवाई करत संशयितांकडून बिबट्याची कातडी हस्तगत केली होती.

या प्रकरणात आतापर्यंत 14 संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले असून, यातील 11 संशयित नाशिक जिल्ह्यातील आहेत. स्थानिक वनविभागाच्या नाकावर टिच्चून शहापूर वनविभागाने कारवाई केली. या प्रकरणातील अपयश झाकण्यासाठी स्थानिक वनविभागाने एका दुकानावर धाड टाकून शेड्युल 1 व 4 मधील वन्यप्राण्याची सुटका केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, वन्यजीवांची शिकार व अवयव तस्करी रोखण्यासाठी केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रात वन्यजीव गुन्हे कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, वन्यजीव गुन्ह्यांची माहिती एका 'क्लिक'वर उपलब्ध झाली आहे. मात्र, या कक्षाचे नेटवर्क राज्यभर न विस्तारल्याने वनगुन्हेगार मोकाट फिरत आहे. त्यातच वनगुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण अत्यल्प असल्याने वनगुन्हेगारांचे चांगलेच फावत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. इतर जिल्ह्याप्रमाणेच नाशिकमध्ये वनगुन्हेगारी आहे. मोठी शहरात गैरसमज व अंधश्रद्धेतून तस्करीचे प्रकार घडतात. वनगुन्हेगारीचे पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात येत आहे.
– नितीन गुदगे, मुख्य वनसंरक्षक (नाशिक)

गुन्हेगारांचे स्लिपर सेल
वनक्षेत्रातील मृत, अशक्त अथवा बिबट्याची शिकार करून त्याची कातडी व इतर अवयव विकण्यासाठी 'स्लीपर सेल' कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती शहापूर प्रकरणात समोर आली आहे. या सेलमध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जव्हारमधील स्थानिक रहिवासांचा समावेश आहे. नाशिकसह लगतच्या परिसरात स्लीपर सेलचे नेटवर्क सक्रिय आहे. मात्र, त्याचे मुख्य धागेदोरे नाशिकमध्येच असल्याची चर्चा आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news