नवरात्रोत्सव : भगूरची पूर्णाकृती, अष्टभुजाधारी रेणुकामाता

Bhagur Renuka www.pudhari.news
Bhagur Renuka www.pudhari.news
Published on
Updated on

महात्म्य नवरात्रोत्सवाचे 

देवळाली कॅम्प : संजय निकम

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली रेणुकामाता जिल्हाभरातील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविकांचेही श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी राज्यभरातील अनेक ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येत असतात.

येथे पहिल्या माळेपासून भाविकांचा दर्शनासाठी ओघ वाढला आहे. आतापर्यंत 25 ते 30 हजार भाविकांनी दर्शन घेतले आहे. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे देवीचे दर्शन मिळाले नसल्याने यंदा भाविकांमध्ये एक चैतन्याचे वातावरण आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला असून, देवीचे व्यवस्थित दर्शन घ्याता यावे म्हणून महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे दररोज पहाटे व रात्री महाआरती होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जागृत देवी अशी ख्याती असलेल्या रेणुकादेवीची ही मूर्ती पूर्णाकृती, अष्टभुजाधारी आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी या मंदिराचे दगडी बांधकाम केल्याचे सांगितले जाते. पुराणातील उल्लेखानुसार, भृगू ऋषींनी दारणा नदीच्या काठी रेणुकामातेची स्थापना केली, तेव्हा तपोवनाची देवी म्हणून ती ओळखली जायची. येथे भृगू ऋषींनी तिची आराधना केली. मंदिरामध्ये दर्शन भागात देवीचे वाहन सिंहाचा पुतळा आहे. तेथेच जिद्दीचे व चिकाटीचे प्रतीक असलेले कासव विराजमान आहेेे. मंदिरासमोर बारव आणि भुयारी मार्ग आहे. देवीचे दर्शन घेऊनच श्रीरामाने या भुयारी मार्गाने सीतेच्या शोधासाठी सर्वतीर्थ टाकेद गाठल्याची आख्यायिका आहे. भगूरचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नित्यनियमाने देवीच्या दर्शनास येत असत. अंदमानच्या तुरुंगातून परतल्यावर सावरकरांनी देवीचे आवर्जून दर्शन घेतले होते. कपडा व्यावसायिक धटिंगण यांनी 1941 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. पूर्वी हे मंदिर कौलारू तसेच गाभारा छोटा होता. भाविकांच्या सहकार्याने मंदिर समितीने 2002 मध्ये मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. 2012 कलशपूजन, वास्तूपूजन शतचंडी महायाग माधवगिरी महाराज, किशोर व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

विविध सामाजिक उपक्रम
येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिरात देवीसमोर अखंड नंदादीप तेवत असतो. त्यातील तेलाचा औषधी उपयोग आहे. तसेच मंदिरासमोरील बारवाच्या पाण्याने स्नान केल्यास त्वचेचे विकार दूर होतात, अशी श्रद्धा आहे. नवरात्रात पहाटे 5 ला घटस्थापना होेते. चिंगरे यांची 13 वी पिढी पुजारी म्हणून कार्यरत आहे. यावर्षी वंदन चिंगरे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. नवमीला कुळधर्म केला जातो. पुरणाचा नैवद्य दाखवून दसर्‍याला सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. परिसरातील महिला घटी बसत असल्याने त्यांच्या निवासाची सुविधा येथे करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील भाविक येथे येतात. नवरात्रानंतरचा कोजागरी पौर्णिमा उत्सवही उत्साहात साजरा होतो. सर्वधर्मीयांचे हे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर लष्कराच्या हद्दीत असल्याने जवानही कुटुंबीयांसह दर्शनाला येतात. त्यांच्यामुळे देवीची देशभर ख्याती पसरली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news