नवरात्रोत्सव : देवी मंदिरांत भाविकांची मांदियाळी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : गंगापूर रोडवरील तुळजा भवानी मंदिरात झालेली गर्दी.(छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
नाशिक : गंगापूर रोडवरील तुळजा भवानी मंदिरात झालेली गर्दी.(छायाचित्रे : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामदैवत कालिका मातेसह शहरातील देवी मंदिरांमध्ये अष्टमीच्या मुहूर्तावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या 'कालिका माता की जय; बोल आई अंबेचा उदो, उदो' च्या घोषाने अवघा मंदिर परिसर दुमदुमला होता. अष्टमीनिमित्त मंदिर व्यवस्थापनातर्फे होमहवन करण्यात आले. तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आले.

नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि.3) अष्टमीनिमित्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. यावेळी महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. सायंकाळी ग्रामदेवता कालिका देवीच्या दर्शनासाठी अर्धा किलोमीटरची रांग लागली होती, तर पंचवटीमधील सांडव्यावरच्या देवीच्या चरणी दिवसभरात हजारो नाशिककर लीन झाले. याशिवाय जुन्या नाशिकमधील पोपडा देवी, भगूरची रेणुका माता, लवाटेनगरमधील देवी मंदिर, घनकर गल्लीमधील तुळजा भवानी यासह शहरातील अन्य देवी मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांचा राबता होता. अष्टमीनिमित्त सायंकाळी मंत्रोच्चाराच्या घोषात होमहवन, पूजन करण्यात आलेे. यावेळी पारंपरिक पद्धतीने कोहळ्याचा बळी देण्यात आला. होमहवनामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. दरम्यान, पावसाने कृपा केल्यामुळे गरबा खेळण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती. विशेष करून युवावर्गाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

दसर्‍याला शस्त्रपूजन
नवरात्रोत्सवात मंगळवारी (दि. 4) घरोघरी तसेच मंदिरांमध्ये नवमीपूजन करण्यात येईल. बुधवारी (दि. 5) दसर्‍याला देवीच्या सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडेल. दसर्‍यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भोसलासह विविध संस्थांमध्ये शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर दणक्यात
दसरा साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news