लातूर : ‘गोगलगायी’च्या गतीनेच राज्य सरकार मदत देणार का? : आमदार धीरज देशमुख | पुढारी

लातूर : ‘गोगलगायी’च्या गतीनेच राज्य सरकार मदत देणार का? : आमदार धीरज देशमुख

लातूर, पुढारी वृतसेवा : अतिवृष्टी, संततधार अन् गोगलगायींचा प्रादुर्भाव यामुळे मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या जायबंदी झालेल्या शेतकर्‍यांना आधाराची गरज आहे. सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तथापी ती अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली नाही, हे वास्तव दाखवत सरकार गोगलगायीच्या गतीने मदत देणार का? असा उपरोधीक सवाल लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सरकारला केला आहे.

लातूर जिल्ह्यात या तिन्ही आपत्तीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. नगदी पीक म्हणून लाखो हेक्टर्सवर घेतलेल्या सोयाबीनवरच गोगलगायी अन् मोझॅकने हल्ला केल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टी अन् संततधार पावसानेही या नुकसानीला मोठा हातभार लावला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना तत्काळ भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशेनात आ. धीरज देशमुख यांनी लावून धरली होती. माजी मंत्री अमित देशमुख यांनीही आवाज उठवला होता. आंदोलन केले होते. काँग्रेस पक्षाच्या वतीनेही रास्ता रोको करण्यात आला होता. अखेर शिंदे- फडणवीस सरकारनेही हे संकट गांभीर्याने घेत गोगलाय व अतिवृष्टी बांधितासाठी मदत जाहीर केली. संततधारेने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाही मदत मिळणार आहे. गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना जिल्ह्यात 98 कोटींची मदतीची तरतूद करण्यात आली आहे. तर संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 292 कोटींची मदत जाहीर झाली आहे. तथापि अजूनही ती शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही.

दसर्‍यासारख्या सण अवघ्या एक दिवसावर आला आहे शिवाय दिवाळीही जवळ आली आहे. नैसर्गिक आपत्तीने भरडलेल्या शेतकर्‍यांजवळ सण साजरा करण्यासाठी पैसे नाहीत. हे वास्तव असताना मदतीसाठी सरकार करत असलेला विलंब योग्य नसून सरकारने अशा वेळी तातडीने मदत करणे गरजेचे असल्याची अपेक्षा आ. धीरज देशमुख यांनी ट्विटर व फेसबुकवरून व्यक्त केली आहे.

Back to top button