

नाशिक : जिल्हा परिषदेच्या तिघा खातेप्रमुखांविरोधात महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणी विभागप्रमुखांवरील झालेली कारवाई, या प्रकरणानंतर वाढलेल्या तक्रारी यातच रजेवर जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा परिषदेतील वातावरण गढूळ झाले आहे. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटू लागल्याची भावना झाली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सोमवारी (दि. 28) विभागप्रमुख, पुरूष कर्मचारी व महिला कर्मचारी यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. यात मित्तल यांनी तुम्ही सुरशिक्षित आहात, चांगले वातावरण असल्याचा विश्वास दिला. यानंतर एकत्रित काम करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
सोमवारी (दि.28) सकाळी विभागप्रमुख यांची बैठक मित्तल यांनी घेतली. या बैठकीत, त्यांनी विभागप्रमुखांशी वन टू वन चर्चा केली. यात, घडलेल्या घटनांवर फारशी चर्चा करू नका, तुम्ही येथे सुरशिक्षित आहात. काही दिवासांपासून नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगले वातावरण ठेवा सर्व झटकून कामाला लागा, असे मित्तल यांनी सांगितले. नवीन सभागृहात महिला कर्मचाऱ्यांशी मित्तल यांनी संवाद साधला.
महिलांवर कोणताही अत्याचार, छळ केला जाणार नाही, खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, काही तक्रारी असल्यास बाहेर चर्चा करू नका थेट माझ्याशी बोला असे सांगत, चांगले वातावरण आहे चांगले काम करा, असे सांगितले. सायंकाळी मित्तल यांनी रावसाहेब थोरात सभागृहात पुरूष कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीतही मित्तल यांनी कर्मचाऱ्यांना सुरशिक्षित असल्याची हमी दिली. कामकाज करताना चांगले वातावरण ठेवा, अविश्वास दाखवू नका सहकार्याने काम करा, असे सांगत काही तक्रारी असल्यास प्रशासनांशी थेट संवाद साधा असे त्यांनी सांगितले. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनिया नाकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल उपस्थित होते.