

नाशिक : जिल्हा परिषदेतील विशाखा समितीकडे प्राप्त तक्रारींनुसार चौकशी सुरू असलेल्या संबंधित विभागप्रमुखास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेतील एका विभागप्रमुखाविरोधात निनावी पत्रे आणि पेनड्राइव्हच्या माध्यमातून प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, चौकशीसाठी प्रकरण विशाखा समितीकडे सोपविण्यात आले. समितीमार्फत संबंधित विभागप्रमुखाची तसेच तक्रारदारांची चौकशी झाली. या प्रक्रियेसंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यांची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या चौकशीबाबत अनेक प्रश्नदेखील उपस्थित झाले. त्यावर, प्रधान सचिव यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणी संबंधित विभागप्रमुखावर कारवाईचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. त्यानुसार या विभागप्रमुखास पुढील आदेश येईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रधान सचिवांच्या आदेशानुसार संबंधित विभागप्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही कार्यवाही असेल.
आशिमा मित्तल, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.