Zilla Parishad Nashik | शिक्षक भरती सुरु; परीक्षा कालावधीत शाळेला मिळाले शिक्षक

नाशिक : शिक्षकांना नियुक्ती आदेश देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव आदी.
नाशिक : शिक्षकांना नियुक्ती आदेश देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव आदी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवून पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांना शनिवारी (दि. ९) समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. १७३ मराठी माध्यम, ४५ गणित व विज्ञान, तर ४ इंग्रजी माध्यमातील अशा एकूण २२२ शिक्षकांना पदस्थापना देत त्यांना आदेशाचे वितरण करण्यात आले.

गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या अपलोड केलेल्या शिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी गत आठवड्यात झाली. त्यानंतर यादीतील १ ते २३० पात्र उमेदवारांची शनिवारी (दि.९) पदस्थापना देण्यासाठी प्रक्रिया राबविली गेली. गंगापूर रोडवरील होरायझन अकॅडमीच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

डी.एड., बी.एड. या व्यावसायिक पात्रतेसह अभियोग्यताधारक टीईटी, सीटीईटी या परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या पात्र बेरोजगारांसाठी पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर दि. १६ ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत नोंद केलेल्या २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह ४ हजार ८७९ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार गुणवत्तेसह सर्व प्रकारच्या आरक्षणानुसार ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करत, शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर ३२० पदांच्या जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण २३० उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती.

पदस्थापना प्राप्त झाल्यानंतर लगेच शिक्षकांना नियुक्तीचे आदेशदेखील वितरीत करण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, प्रभारी उपशिक्षणाधिकारी धनजंय कोळी, अधीक्षक श्रीधर देवरे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, लिपिक सरोज बागूल, जयवंत शिंदे, सूरज शिंदे, अनिकेत गरुड, सलीम पटेल, अरुण भदाणे, सुनील सोनवणे आदी उपस्थित होते.

तालुकानिहाय शिक्षक असे
नांदगाव (६९), येवला (३६), चांदवड (२७), इगतपुरी (७), मालेगाव (३७), बागलाण (१०), सिन्नर (२०), निफाड (१३), दिंडोरी व देवळा प्रत्येकी २ या प्रमाणे एकूण २२२ शिक्षकांना समुपदेश पद्धतीने पदस्थापना देण्यात आली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news