प्रासंगिक : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे मर्म | पुढारी

प्रासंगिक : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे मर्म

डॉ. श्रीमंत कोकाटे

औरंगजेबासारख्या प्रचंड सैन्यसामर्थ्य असणार्‍या, धूर्त, पाताळयंत्री, क्रूर आणि निर्दयी सम्राटाचा छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या धैर्याने आणि शौर्याने प्रतिकार केला, त्याला इतिहासात तोड नाही. संभाजीराजांचे बलिदान त्याग, समर्पण, धैर्य, शौर्य, निर्भीडपणा, स्वाभिमान, बाणेदारपणा, निष्ठा आणि समर्पण शिकविते. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. उद्या (दि. 11 मार्च) छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन. त्यानिमित्ताने…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य सहज जिंकता येईल, या इराद्याने औरंगजेब स्वराज्यात आला तेव्हा छत्रपती संभाजीराजे केवळ चोवीस वर्षे वयाचे होते. ज्या औरंगजेबाचे राज्य इराणपासून बांगलादेशपर्यंत आणि नेपाळपासून तामिळनाडूपर्यंत होते त्या औरंगजेबाविरुद्ध अत्यंत निकराचा लढा संभाजीराजांनी दिला. संभाजीराजांनी बर्‍हाणपुरापासून गोवा आणि विजापूरपासून जंजिर्‍यापर्यंत औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. औरंगजेब हा त्या काळातील जगातील सर्वात मोठा सत्ताधीश होता.

औरंगजेबाने मराठ्यांचे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी जंग जंग पछाडले. परंतु संभाजीराजांनी त्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. एक-दोन वर्षासाठी दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला राजधानीपासून सुमारे 27 वर्षे दक्षिणेकडे थांबावे लागले. शेवटी त्याचा अंत महाराष्ट्रातच झाला. शंभूराजांनी त्याला जेरीस आणले. त्यामुळेच औरंगजेेबाच्या पदरी असणारा खाफीखान म्हणतो. “संभाजीराजे मोगलांसाठी शिवाजी राजांपेक्षा दहा पटींनी तापदायक होते.” शिवरायांच्या काळात औरंगजेब दक्षिणेत आला नाही. तो संभाजीराजांच्या काळात दक्षिणेेत आला. त्यामुळे अत्यंत तरुण वयाच्या संभाजीराजांना औरंगजेबाविरुद्ध संघर्ष करावा लागला. औरंगजेबासारख्या धूर्त, पाताळयंत्री, क्रूर आणि निर्दयी सम्राटाचा संभाजीराजांनी मोठ्या धैर्याने आणि शौर्याने प्रतिकार केला. निद्रेचे चार तास सोडले तर सतत 20 तास ते स्वराज्य रक्षणासाठी मोगल, सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रजांविरुद्ध लढत होते. ते संकटसमयी हतबल, निराश किंवा नाउमेद झाले नाहीत.

‘संकटसमयी कोणत्याही दैवावर विश्वास न ठेवता मोठ्या धैर्याने लढतो तो खरा वीर पुरुष!’ असे संभाजीराजांचे मत होते.
संभाजीराजांनी रयतेवर जीवापाड प्रेम केले. गरिबांना न्याय दिला. दुष्टांचा बंदोबस्त केला. महिलांना संरक्षण दिले. आपले सावत्र बंधू राजाराम महाराजांना अत्यंत प्रेमाने वागविले. त्यांचे तीन विवाह संभाजीराजांनी करून दिले. मातोश्री सोयराबाई यांना सावत्रपणाची वागणूक न देता त्यांना अत्यंत आदराने वागविले. सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची आहे, असे त्यांचे सावत्र मातेबद्दल मत होते. पत्नी येसूबाईंना संभाजीराजांनी सर्वाधिकार दिले. त्यांना स्वराज्याचे कुलमुखत्यार केले.

‘श्री सखी राज्ञी जयतू’ या नावाचा येसूबाईंचा शिक्का बनविला. पत्नीला सर्वाधिकार देणारे संभीजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे आणि स्त्री सन्मानाचे पुरस्कर्ते होते. आपल्या आणि परराज्यातील स्त्रियांचा सन्मान करणारे संभाजीराजे आपल्या वडिलांचे अनुयायी होते. आपल्या राज्यातील सैनिकांना आणि रयतेला त्यांनी अत्यंत सन्मानाने वागविले. याबाबत समकालीन फ्रेंच पर्यटक अ‍ॅबे कॅरे म्हणतो, “संभाजीराजे वयोवृद्ध आणि समवयस्क सैनिकांना अत्यंत मायेने आणि आदाराने वागवतात. जखमी सैनिकांना स्वत: भेटून त्यांच्या औषधोपचाराबाबत चौकशी करतात.” यावरून संभाजीराजांची प्रेमळ आणि दयाळू वृत्ती स्पष्ट होते. ज्येष्ठांबद्दल असणारा आदरभाव प्रकट होतो. संभाजीराजांसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी अन्यत्र पाहिला नाही, असे अ‍ॅबे कॅरे नमूद करतो.

वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी दहा हजार सैन्यानिशी गुजरात मोहीम यशस्वी करून शत्रूंना पराभूत केले, असे कॅरे सांगतो. शिवाजी राजांना आपला पुत्र संभाजीराजे यांच्याबद्दल खूप प्रेमभाव आणि अभिमान वाटत असे. राज्याची वाटणी देण्याचा प्रस्ताव जेव्हा शिवाजी राजांनी संभाजी राजांसमोर ठेवला तेव्हा संभाजीराजे म्हणाले, “दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन; परंतु राज्याची वाटणी नको.” यातून संभाजी राजांची स्वराज्यनिष्ठा, विनयशीलता आणि आज्ञाधारकपणा स्पष्ट दिसतो. ते जितके विनयशील होते तितकेच ते कर्तव्यकठोर होते. ते तलवारबाजीमध्ये निपुण होते. त्यांनी जसे रणांगण गाजविले तसेच ज्ञानाचे क्षेत्रदेखील गाजविले. ते विद्याव्यासंगी होते.

त्यांचे मराठीबरोबरच संस्कृत, हिंदी इत्यादी भाषांवर कमालीचे प्रभुत्व होते. त्यांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत तर नखशिख, नायिकाभेद, सातसतक हे तीन हिंदी ग्रंथ लिहिले. ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांचा मोठा नावलौकिक होता. याचा मोठा पुरावा म्हणजे तत्कालीन धर्मपंडित गागाभट्ट यांनी ‘समयनय’ हा ग्रंथ संभाजीराजांना अर्पण केलेला आहे. गागाभट्ट हा त्या काळातील महाविद्वान पंडित होता. गागाभट्टाने ग्रंथ संभाजीराजांना अर्पण करणे यावरून संभाजीराजांच्या विद्वत्तेची आपल्याला कल्पना येते. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील संभाजीराजांना ‘महापंडित’म्हणून गौरवितात.

रयतेचे स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी एक-दोन वर्षासाठी आलेल्या औरंगजेबाला जखडून ठेवण्याचे काम संभाजीराजांनी केले. अत्यंत प्रतिकूल काळात संभाजीराजांनी स्वराज्याचे रक्षण केले. त्यामुळे ते स्वराज्यरक्षक ठरतात. दक्षिण दिग्विजयानंतर उत्तर भारत जिंकण्याचा संकल्प शिवरायांनी केला होेता. त्याला मूर्त रूप आणण्यासाठी संभाजीराजांनी नियोजन केले. शहाजादा अकबराला समुद्रमार्गे वायव्येकडून दिल्लीकडे पाठवायचे, औरंगजेबाला दक्षिणेत गुंतवून स्वत: सुरतमार्गे दिल्लीकडे जायचे आणि दिल्लीचे तख्त ताब्यात घ्यायचे, असे नियोजन संभाजीराजांनी केले होते. परंतु दरम्यान ते पकडले गेले. स्वराज्य संवर्धनासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे ते स्वराज्यसंवर्धक ठरतात.

औरंगजेब जिझिया कर लादून बिगर मुस्लिमांचा छळ करत होता. धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करत होता. सक्तीने धर्मांतर करत होता. अशा काळात संभाजीराजे शांत बसले नाहीत. त्याचा प्रतिकार केला. ज्याप्रमाणे शिवाजी राजांनी मुस्लिम झालेल्या नेताजी पालकरांना स्वधर्मात घेतले; तसेच संभाजीराजांनी सक्तीने मुस्लिम केेलेल्या गंगाधर कुलकर्णीला स्वधर्मात घेतले. परधर्मीयांचा धर्माच्या आधारे द्वेष-छळ न करता स्वधर्माचा अभिमान बाळगणारे संभाजीराजे होते. त्यामुळे त्यांना ‘धर्मवीर’ म्हणणे ऐतिहासिक तथ्याला सुसंगत असेच आहे. औरंगजेबाच्या धर्मांधतेला त्यांनी प्रतिकार केला.

संभाजीराजांना पकडून ठार मारण्यासाठी औरंगजेबाने जंग जंग पछाडले. शेवटी त्याच्या सरदारांनी संभाजीराजांना 1 फेबु्रवारी 1689 रोजी कोकणातील संगमेश्वर याठिकाणी पकडले. त्यांचा प्रचंड झळ केला. परंतु संभाजीराजे डगमगले नाहीत. ते औरंगजेेबाला शरण गेले नाहीत. त्यांनी प्राण वाचविण्यासाठी औरंगजेबाकडे तडजोड केली नाही. संभाजीराजांचे सुमारे 39 दिवस हाल हाल केले. त्यांनी औरंगजेबाकडे दयायाचना केली नाही. मोठ्या धैर्याने ते समोरे गेले. शेवटी त्यांचे डोळे, जीभ कापून त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. परंतु त्यांनी आपला स्वाभिमान गमावला नाही. त्यांच्या शौर्याला, धैर्याला, त्यागाला, स्वाभिमानाला, निर्भीडपणाला जगाच्या इतिहासात तोड नाही. शिवरायांनी निर्माण केेलेल्या स्वराज्यावरील निष्ठा त्यांनी बदलली नाही. मृत्यू समोर दिसत असतानाही ते निर्भीडपणे मृत्यूला सामोरे गेेले. औरंगजेबाला वाटले, संभाजीराजांच्या हत्येमुळे मराठा नाऊमेद होतील, घाबरतील. पण मराठे मोठ्या त्वेषाने, धैर्याने पेटून उठले.

संभाजी राजांच्या त्यागाने अन्यायाविरुद्ध स्वराज्यरक्षणासाठी लढण्याची प्रेरणा दिली. पुढे दहा वर्षांच्या छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरंगजेबाविरुद्ध निकराने लढले. संभाजी राजांच्या समर्पणाने मराठ्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली. अर्ध्या आशिया खंडावर राज्य असणार्‍या औरंगजेबाला नेस्तनाबूत केले. संभाजीराजांचे बलिदान त्याग, समर्पण, धैर्य, शौर्य, निर्भीडपणा, स्वाभिमान, बाणेदारपणा, निष्ठा आणि समर्पण शिकविते. मृत्यूला न घाबरता अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा संभाजी राजांच्या बलिदानाने मराठ्यांना मिळाली. (मराठा ही व्यापक संकल्पना आहे. अठरापगड जातींना मराठा म्हटलेे आहे.) त्यांच्या बलिदानाला त्यागाला जगाच्या इतिहासात तोड नाही. दिनांक 11 मार्च हा संभाजीराजांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

Back to top button