

नाशिक : शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ या राज्यव्यापी अभियानांतर्गत शासनाने शालेय शिक्षण विभागाला राज्यात एकूण २० लाख वृक्षलागवडीचे महत्वाकांक्षी लक्ष्य दिले होते. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यंदाच्या वर्षी ७० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
या उद्दिष्टपूर्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी नियोजनबध्द पध्दतीने काम करून तब्बल ७७ हजार झाडे लावली आहे. लावलेल्या रोपांचे महाफॉरेस्ट संकेत स्थळावर जिओ टॅगिंग असून, ११० टक्के यश मिळविले आहे.
जिल्ह्यातील शाळांच्या आवारात ही वृक्ष लागवड करण्यात आल्याने शाळांचा परिसर देखील पुढील काळात हिरवाईने नटणार आहे. येणाऱ्या काळात या झाडांची निगा राखत त्यांना मोठे करण्याचा संकल्पही विभागाने केला आहे. शासनाच्या अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करून शिक्षण विभागाने 'हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र' अभियानात योगदान दिले आहे.
शिक्षण विभागाने शाळा स्तरावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करून शिक्षक, विद्यार्थी, पालक व स्थानिक ग्रामस्थ यांना या उपक्रमात सामील करून घेतले. शाळा परिसरात तसेच शैक्षणिक संकुल परिसरात अभियानंतर्गत देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शाळा परिसर अधिक हिरवागार व आकर्षक होणार आहे. येणा-या काळात या झाडांची निगा राखत त्यांना मोठे करण्याचा संकल्पही विभागाने केला आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक व जिल्हा नोडल अधिकारी संतोष झोले आदींनी परिश्रम घेतल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी दिली.
हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र अभियान अधिक पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी शासनाने 'अमृत वृक्ष' मोबाइल ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे शिक्षण विभागासह सर्व विभागांनी लावलेल्या प्रत्येक झाडाचा जिओ-टॅगसह फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. यामुळे कोणते झाड कुठे लावले आहे, त्याची स्थिती काय आहे, हे शासन स्तरापासून शाळा स्तरापर्यंत स्पष्ट दिसणार आहे. या ॲपमुळे प्रत्येक टप्प्यावर झाडांची वाढ, देखभाल व यशाचे आकडे सहज निदर्शनास येतील. डिजिटल पध्दतीने झाडांची नोंद झाल्याने पारदर्शकता, जबाबदारी आणि सातत्यपूर्ण निगा राखता येणार आहे.