

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ओमकार पवार लागलीच फिल्डवर उतरले आहे. पवार यांनी कळवण तालुक्यातील नवी बेज व ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या. या भेटीत पवार यांना दोन्ही केंद्रात 2-2 कर्मचारी गैरहजर सापडले. पवार यांनी तात्काळ चारही कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासा मागविला आहे. दोन दिवसांत समाधनाकारक खुलासा न मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार यांनी सरप्राईज व्हीजीटवर भर देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी मुख्यालयातील विभागांना अचानक भेटी दिल्या होत्या. आता पवार थेट फिल्डवर उतरले आहे. पवार यांनी रविवारी (दि. 24) कळवण तालुक्यातील नवी बेज व ओतूर येथील आरोग्य केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील रजिस्टरची स्वतः शहनिशा केली. येथील कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकाची त्यांनी पाहणी केली. दोन्ही केंद्रातील पायाभूत सुविधाबाबत माहिती घेत, आरोग्य सेवा यांचा आढावा घेतला. स्वच्छता, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, तसेच औषध व तपासणी सेवा आदी बाबींची तपासणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्यासंबंधीही पवार यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. रुग्णांना 24 तास सेवा देण्याची जबाबदारी आहे. ती पार पाडावी, रुग्णांकडून कोणत्याही तक्रारी येता कामा नये अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. गैरहजेरीसारख्या निष्काळजीपणामुळे रुग्णसेवा बाधित होणे अक्षम्य असून त्याविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राहुल साबळे व आरोग्य सहायक निवृत्ती बागूल हे कर्मचारी कार्यस्थळी अनुपस्थित होते. तर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी लीना गुजराथी तसेच परिचर नीलेश चौधरी अनुपस्थित असल्याचे आढळले. या घटनेची गंभीर नोंद घेत मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर मोरे यांना संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी (दि.25) संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. नोटिसांतून समाधानकारक व समर्पक खुलासा प्राप्त झाला नाही, तर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याबाबत पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.