

येवला (नाशिक) : तालुक्यात २०२५ ते २०३० या कार्यकाळात मुदत संपणाऱ्या ९० ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के म्हणजेच ४५ ग्रामपंचायती सरपंच पदासाठी महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालयात ही आरक्षण सोडत गुरुवारी (दि. ३१) सहा वर्षीय प्रणित खिल्लारे या बालकाच्या हस्ते, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार आबा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
सदर सोडतीवेळी नायब तहसीलदार पंकज निवसे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षणामध्ये तालुक्यातील पाटोदा, उंदीरवाडी, जळगाव नेऊर, पारेगाव, सायगाव, बोकटे अशा अनेक मातब्बर नेत्यांच्या प्रमुख ग्रामपंचायतींचा समावेश झाल्याने राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महिलांसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींसाठी काही गावांमध्ये सरळ आरक्षण झाले असून काहींसाठी चिठ्ठीद्वारे सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आले. मागील फेरआरक्षणामुळे काही गावांमध्ये अपेक्षित बदल झाल्याने काही इच्छुकांना दिलासाही मिळाल्याचे दिसून आले. मात्र प्रमुख नेत्यांच्या गावांमध्ये आरक्षण महिलांसाठी गेल्यामुळे अनेकांनी आता आपापल्या पत्नी वा महिला सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.
अनुसूचित जाती : गुजरखेडा, रेंडाळे, तळवाडे.
अनुसूचित जमाती : रहाडी, डोंगरगाव, अंगुलगाव, मातुलठाण, उंदीरवाडी, देशमाने बुद्रुक.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : बाळापूर, गारखेडे, लौकी शिरस, गणेशपूर, पिंपळखुटे बुद्रुक, जळगाव नेऊर, धामणगाव, चांदगाव, खैरगव्हाण, भाटगाव, आडगाव चोथवा, सत्यगाव.
सर्वसाधारण : आंबेगाव, बल्हेगाव, भारम, भुलेगाव, देवरगाव, देवळाणे, धुळगाव, गवंडगाव, कानडी, खामगाव, खरवंडी, खिर्डीसाठे, कोटमगाव बुद्रुक, ममदापूर, नायगव्हाण, पांजरवाडी, पारेगाव, पाटोदा, पिंपळगाव जलाल, सायगाव, सुरेगाव रस्ता, देवठाण, बोकटे, मालखेडा.