

Work on Simhastha project halted due to lack of funds and time
नाशिक : पुढारी वृत्तसेवा निधी आणि वेळेअभावी सिंहस्थ आराखड्यातील रस्ते विकासकामांना महापालिकेने कात्री लावली असताना गत सिंहस्थात तयार केलेल्या रस्त्यांच्या मिसिंग लिंक जोडण्याच्या कामाला यंदाच्या सिंहस्थातही मुहूर्त लाभत नसल्याचे चित्र आहे. शिल्लक कालावधी लक्षात घेता सिंहस्थापूर्वी रस्त्यांच्या मिसिंग लिंकसाठी भूसंपादन तसेच खडीकरण व डांबरीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणे आता शक्य नसल्यामुळे या कामांवरदेखील काट मारण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.
नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थासाठी महापालिकेसह सर्व शासकीय यंत्रणांनी २४ हजार कोटींच्या कामांचा समावेश असलेला सिंहस्थ आराखडा शासनाला सादर केला आहे. यामध्ये नाशिक महापालिकेच्या १५ हजार कोटींच्या आराखड्याचा समावेश आहे. एकीकडे प्रशासनाकडून सिंहस्थाची जोरदार तयारी केली जात असताना दुसरीकडे शासनाकडून सिंहस्थ कामांसाठी निधी मिळत नसल्याने शासकीय यंत्रणा आता मेटाकुटीला आल्या आहेत.
पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मान्य करताना शासनाने सिंहस्थासाठी एक हजार कोटींची तरतूद मंजूर केली आहे. मात्र, हा निधी सिंहस्थ प्राधिकरणाला मिळणार, महापालिकेच्या पदरात पडणार की, जिल्हाधिकारी कार्यालयासाठी दिला जाणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याला आता जेमतेम दोन वर्षांचाच कालावधी शिल्लक राहिला आहे.
महापालिकेसह विविध शासकीय यंत्रणांनी तयार केलेल्या आराखड्याला शासनाची मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे आराखड्यातील प्रस्तावित कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. आता प्रत्यक्ष सिंहस्थाला कमी कालावधी शिल्लक राहिल्याने उर्वरित कालावधीत यातील मोठी कामे पूर्ण होणेही शक्य नाही. त्यामुळे सिंहस्थ आराखड्यातील रस्ते विकासाला महापालिकेने कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. गत सिंहस्थात तयार केलेल्या परंतु भूसंपादनाअभावी प्रलंबित राहिलेल्या मिसिंग लिकची कामे यंदाच्या सिंहस्थापूर्वी करण्याचे महापालिकेने नियोजन होते. परंतु आता या कामांवरदेखील काट मारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
सिंहस्थ आराखड्यात १९ मिसिंग लिंकच्या कामांचा समावेश करण्यात आला होता. वेळ आणि निधीच्या अभावामुळे ही सर्व कामे आता रद्द केली जाणार आहेत. यामध्ये जयशंकर लॉन्स नांदूर-दसक शिव, ट्रॅक्टर हाउस ते तपोवन एसटीपी, टाकळी फाटा ते गांधीनगर प्रेस, संगम पूल ते टाकळी एसटीपी ते मरिमाता मंदिर, उपनगर नाका ते इच्छामणी गणपती मंदिर-नीलगिरी बाग- आरटीओ कॉर्नर, मखमलाबाद गाव ते जेहान सर्कल, पपया नर्सरी ते अंबड-लिंक रोड, सौभाग्यनगर-बिटको चौक-जेलरोड-गोदावरी नदी- नांदूर गाव जत्रा हॉटेल, लेखानगर-कलानगर-वडाळा गाव - रविशंकर मार्ग - विजय-ममता चौक उपनगर नाका, मखमलाबाद ते फॉरेस्ट नर्सरी पूल, नवशा गणपती वृंदावन लॉन्स, बारदान फाटा-अंबड लिंक रोड, मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल ते अक्षता मंगल कार्यालय, हिरावाडी रोड ते एनआयटी कॉलेज, एनआयटी कॉलेज ते म्हसरूळ लिंक रोड, कानेटकर उद्यान ते मोतीवाला कॉलेज या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.