

'That' pit in Gosaviwadi means well of death
नाशिकरोड : प्रफुल्ल पवार
गोसावीवाडी परिसरातील गेल्या तीन वर्षांपासून एका बांधकाम व्यावसायिकाने रस्त्यालगत खोदलेला सुमारे ८० ते ९० फुटांचा खट्टा तसाच ठेवल्याने परिसरातील शाळकरी तसेच लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या खड्यात साचलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात डासांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. खड्यात कुत्रे, मांजरे मृतावस्थेत सापडत असून, त्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या खड्यालगतच्या घराच्या भिंती खचू लागल्या आहेत.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, बिल्डरने हा खड्डा खोदताना महापालिकेचे कुठलेच नियम त्याने पाळलेले नसून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होईल, अशी परिस्थितीत तो तसाच ठेवण्यात आलेला आहे. याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. पंचवटी परिसरात बिल्डरने इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात तीन निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याने गोसावीवाडीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणीही लहान मुले खेळायला जातात. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम्ही वारंवार महापालिकेला तक्रारी करत आहोत. पण, महापालिका आमच्या तक्रारींची दखल घेत नाही. प्रशासनाने वेळेत लक्ष दिले नाही, तर आम्ही महापालिकेसमोर आंदोलन करू, असा इशारा स्थानिक रहिवासी अशोक कोरडे यांनी दिला आहे. सजित शेख यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून हा खड्डा उघडाच आहे. त्यामुळे मुलांच्या जिवाला धोका आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी देताना काळजी आणि सुरक्षा उपाययोजनांसाठी ३१ अटी व शर्ती टाकून परवानगी दिली जाते. त्यात 'ऑल सेफ्टी मेजर अँड प्रिकॉशन सेल्फी टेकन ऑन साइड ड्धुरिंग कन्स्ट्रक्शन' ही अट क्रमांक ३१ असून, त्यानुसार जागेवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक असते.
तसेच विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली आणि व्यावसायिक-सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या परिस्थितीवरील कामगार संहिता २०१८ नुसार सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक असते. या अटींचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र नगररचना कायदा, १९६६ आणि महापालिका कायद्यातील तरतुदींनुसार परवाना रद्द करण्याची कारवाई करता येते.