Valmik Karad's opponents are already in Nashik jail, gang war likely
नाशिक : पुढारी वृत्तसेवा बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संशयित वाल्मीक कराड याच्या जीवाला बीड कारागृहात गिते गँगचा धोका असल्याने, त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलविण्याची चर्चा आहे.
मात्र, कराडचे कट्टर वैरी असलेले आठवले गँगचे तिघे अगोदरच नाशिक कारागृहात असल्याने, गैंगवार भडकण्याची भीती वर्तविली जात आहे. दरम्यान, कराडला नाशिकला आणण्याच्या चर्चेवरूनच कारागृह प्रशासनाची डोकेदुखी वाढल्याची माहिती समोर येत आहे.
बीड कारागृहात कराड गैंग आणि गिते गँगमधील संघर्ष वाढल्याने, कारागृहात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यातून कराडच्या जीवाला धोका अधिक असल्याने, त्याला नाशिकला हलविण्याची चर्चा आहे. मात्र, कराडचे कट्टर वैरी असलेले आठवले गँगचे अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर व ओंकार सवाई हे अगोदरच नाशिकच्या कारागृहात आहेत. गेल्या १ एप्रिल रोजी बीड कारागृहात कराड व महादेव गिते यांना आठवले टोळीने मारहाण केली होती.
त्यामुळे बीड कारागृहात संभाव्य गैंगवार भडकण्याची शक्यता असल्याने, आठवले टोळीतील तिघांनाही नाशिक करागृहात हलविले होते. आता गिते गैंग आणि कराड गँगमधील संघर्ष वाढल्याने, पुन्हा एकदा वाल्मीकच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सध्या बीड कारागृहात कराडला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे.
मात्र, त्याचा बीड तुरुंगातील अधिक काळचा मुक्काम त्याच्या जीवावर बेतण्याची भीती वर्तविली जात आहे. तर नाशिकमध्ये त्याला हलविल्यास पुन्हा एकदा आठवले गँगकडून त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला हलविण्याबाबतचा निर्णय बदलला जाऊ शकतो, असाही सूर आहे.
कराडला हलविण्याबाबत कारागृह प्रशासनाकडे कोणतीही माहिती नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. आरोपीचे प्रत्यार्पण करीत असताना, त्याबाबतचा कारागृह प्रशासनाशी पत्रव्यवहार करावा लागतो.
एखाद्या आरोपीला सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने हलविण्याचे ठरविल्यास, स्थानिक न्यायालयाच्या परवानगी घ्यावी लागते. तसेच ज्या कारागृहात त्याला हलवायचे आहे, त्या कारागृह प्रशासनाला दूरध्वनीद्वारे याबाबतची माहिती द्यावी लागते. तसेच आरोपीला आणल्यानंतर परवानगीबाबतचे संपूर्ण कागदपत्रे कारागृह प्रशासनाकडे जमा करावी लागत असल्याचेही कारागृह प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.