

नाशिक :
ट्रकचालकांना अडवून लुटणाऱ्या एका अनोख्या टोळीचा पर्दाफाश नाशिकरोड पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे या टोळीत दोन तरुणींनी मुलांचा वेश धारण केला होता, तर त्यांच्या मदतीसाठी तीन तरुण साथीदारही होते. पोलिसांच्या धाडसी कारवाईत दोन तरुणींना अटक करण्यात आली असून तीन साथीदार मात्र पसार झाले आहेत.
ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे रोडवरील गुप्ता हॉस्पिटलसमोर घडली. कंटेनर चालक रामनिवास वर्मा यांना या टोळीने थांबवत धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात त्याच्या हातावर व गळ्यावर जखमा झाल्या. त्यानंतर या टोळीने चालकाच्या खिशातील रोख ५ हजार रुपये आणि स्कॅनरद्वारे १ हजार रुपये काढून नेले. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या चालकाने तात्काळ ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधत मदत मागितली.
माहिती मिळताच सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयितांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच एक रिक्षा अडवली. या रिक्षातून दोन जणांना पकडण्यात आले. पोलिसांच्या पुढील चौकशीत ते प्रत्यक्षात महिला असल्याचे स्पष्ट झाले. पकडलेल्या तरुणींची नावे निकिता आव्हाड आणि कोमल आढाव (रा. जेलरोड, नाशिक) अशी आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील तीन साथीदार — प्रेम धाटे, धीरज धाटे आणि शुभम उर्फ राठोड हे मात्र घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी लुटमारी करणाऱ्या टोळीविरोधात कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.