

सुनिल थोरे
चांदवड : चांदवड तालुक्यातील राहूड घाटात सोमवारी (दि. ८) रात्री नऊ वाजता भीषण अपघात घडला. यात टोमॅटोने भरलेला ट्रक, एक कंटेनर आणि भारत गॅस कंपनीचा एलपीजी गॅस कंटेनर यांचा समावेश होता. अपघात इतका जबरदस्त होता की गॅस कंटेनरमधून गॅस मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागला. काही क्षणांतच संपूर्ण परिसरात गॅसचा तीव्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच चांदवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास वाघ, सोमा टोलवेज कंपनीचे अधिकारी तसेच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी धावून आले. मात्र गॅस सतत लिक होत असल्याने सर्वप्रथम घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला.
गॅसचा वास राहूड गावापर्यंत पसरल्याने गावकऱ्यांतही प्रचंड भीती निर्माण झाली होती. कोणताही स्फोट अथवा आग लागून मोठा अनर्थ घडू नये, यासाठी नागरिकांना ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
दरम्यान, गॅस सतत हवेत पसरत असल्याने परिसरातील वातावरण गंभीर झाले होते. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दल व पोलिस प्रशासन गॅस लींक थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. या अपघातामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून मालेगावकडे जाणारी सर्व वाहने मनमाड मार्गे वळवण्यात आली.