नाशिक : गुलाल - फुलांची उधळण, ढोल, शंख, डफ, महाकाल झांज यांसह भगव्या ध्वजांसह पारंपरिक वेशभूषेतील महिला - पुरुष, मुलांचे ऊर्जेने भारलेले अप्रतिम वादन, ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा घोष, चार वर्षांच्या बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असलेल्या लेजीम पथकांचे तालबद्ध संचलन. कुठे नंदीवर आरूढ शिवपार्वती, तर कुठे मिरवणुकीत अवतरला महाकाल शिवरुद्र! आगीचे लोळ ओकणारे अघोरी नृत्यांचे सादरीकरण. अशा चैतन्यपूर्ण, उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात वरुणराजाच्या जलाभिषेकात निरोप देण्यात आला. कोसळणार्या पावसात गोदावरीसह श्रद्धा आणि भक्तीचाही महा‘पूर’ दिसला.
गेले 11 दिवस चैतन्य आणि उत्साह, भक्ती, शक्ती अन् आनंदाचे पर्व घेऊन आलेले गणराय शनिवारी (दि. 6) भक्तांवर आशीर्वादाची पखरण करून आपल्या गावी परतले. घरोघरी भाविकांनी विधिवत पूजन, आरती करून गणरायाला निरोप दिला. कोसळणार्या सरींतही भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदीपात्रात जाणे टाळून अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांत श्रींचे विसर्जन केले.
शहरात शनिवारी (दि. 6) सकाळी 11.15 च्या सुमारास वाकडी बारव येथून गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला भर पावसात प्रारंभ झाला. त्यामध्ये मानाच्या गणपतींसह 25 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि गणरायाची आरती करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.
प्रथम मानाच्या नाशिक महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची विधिवत पूजा भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, भक्त उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी ढोल वाजवून वादनावर ठेका धरला. मनीषा खत्री यांनीही ढोल पथकातील भगवा ध्वज हातात घेत ढोल वादनाचा आनंद घेतला.
मिरवणुकीतील मानाच्या गणपतीचा क्रम ठरलेला होता. त्यात अग्रभागी नाशिक महापालिका मंडळाचा गणपती, रविवार कारंजा मित्रमंडळ (चांदीचा गणपती), गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ (साक्षी गणपती), श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ या क्रमाने मिरवणूक पुढे सरकत होती. सकाळी 9.30 पासून रात्री उशिरापर्यंत कोसळणार्या सरींतही वाद्य पथक आणि गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. वरुणराजाच्या जलाभिषेकामध्ये सहस्रनिनाद आणि जयघोषात आसमंत दुमदुमला होता. मिरवणूक मार्गांवर नियोजित ठिकाणी वादक पथकांनी सादरीकरण केलेे.
दुपारी 3 नंतर नाशिककरांनी पावसाची तमा न बाळगता मिरवणूक पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे यंदा गतवर्षीपेक्षा मिरवणुकीची तब्बल दोन ते अडीच तास लवकर सांगता झाली. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत गणेशभक्तांनी उत्साह, ऊर्जेने बाप्पाला निरोप दिला.
मिरवणूक मार्ग
भद्रकाली येथील वाकडी बारव येऊन प्रारंभ. तेथून महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरमार्गे संत गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टॅण्डवरून पंचवटी कारंजामार्गे गोदाकाठी सांगता.
अवतरले शंकर-पार्वती
पहाटे 3 पर्यंत पारंपरिक वाद्यांसह मिरवणुकीस पोलिस प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसले. महाकाल पथकात भव्य नंदीवर बसलेले शंकर- पार्वती, महाकाल, अघोरी वेशभूषेतील भक्त, हनुमान, शिवशंकराचे तांडव नृत्य विशेष आकर्षण ठरले. अघोरी साधूंनी नरमुंडांच्या माळा घालून अघोरी वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तोंडातून आगीचे लोळ काढणारे अघोरीही लक्ष वेधत होते.
लेजीम पथक अन् फलक
गुलालवाडी व्यायामशाळा गणेश मंडळ मिरवणुकीतील नाशिकचा मानाचा तिसरा गणपती आहे. मंडळाने यंदा शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. मंडळाच्या भक्तांमध्ये उत्साह दिसून आला. ढोल पथकासमोेर तीन वर्षांच्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या लेजीम पथकांनी सहभाग घेतला. गेल्या दोन महिन्यांच्या सरावाची बहारदार झलक मंडळाने सादर केली, तर सर्व वृद्धाश्रमे रिकामे होतील आणि तुमचे देव आपल्या घरीच राहतील, अशी भावनिक साद घालणारे फलकही आकर्षण ठरले.
पर्यायी मार्गाची गरज
मंडळांची संख्या बघता, नाशिकमध्येदेखील पुण्याच्या धर्तीवर एका पर्यायी मिरवणूक मार्गाची आवश्यकता सहस्रनाद वाद्य पथकांसह काही मंडळांनी व्यक्त केली. मानाची आणि जुनी तसेच क्रमवारीतील पहिल्या मंडळांच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीस वेळ लागतो. त्यामुळे मागच्या मंडळांना नागरिकांसमोर सादरीकरणासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. नाशिककर नागरिकही घरच्या श्रींचे विसर्जन करून दुपारी 4 नंतर घराबाहेर पडतात. त्यामुळे पर्यायी मिरवणूक मार्गाची आवश्यकता वादन पथकांनी व्यक्त केली.