

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आजार बरा करण्यासह दैवी शक्तीच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पनवेल येथील महिलेला साडेसात लाखांचा गंडा घातल्याचा आरोप असलेला भोंदू अरुण धोंडू पाटील फरार झाला आहे. महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून अघोरी विधो केल्याप्रकरणी सोमवारी (दि. १९) मध्यरात्री गंगापूर पोलिस ठाण्यात जादुटोनावविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गंगापूर पोलिसांचे पथक संशयिताचा शोध घेत आहे.
पनवेल येथील अस्थमाग्रस्त महिलेला गंगापूर परिसरातील अरुण पाटील याच्या कथित दैवी शक्तीबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर अरुण पाटीलने महिलेला आणि तिच्या पतीला नाशिकला आणण्यासाठी वाहन पाठवले. त्यांच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधून त्यांना नाशिकला आणले. पूजा केल्यानंतर पुन्हा पट्टी बांधून पनवेलला सोडले.
असा दोनदा विधी करण्यात आला. आजारात गुण आल्याचा भास झाल्यामुळे महिलेचा त्यावर विश्वास बसला. त्यानंतर पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलेकडून मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगण्यात आले होते. गंगापूर रोडवरील बालाजी मंदिर परिसरात तिच्यावर अघोरी विधी केला.
तिला पांढरे, पारदर्शक वस्त्र नेसवले. मानवी कवटीसह पूजेच्या साहित्याचा वापर करण्यात आला होता. यावेळी बोकड बळी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या तिन्ही विधीसाठी साडेसात लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, पैशांचा पाऊस पडला नाही आणि आजारही बरा झाला नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेत प्रकरण निदर्शनास आणून दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
भोंदू अरुण पाटील हा राजकारणातही सक्रिय असून, तो एका पक्षाचा प्रदेश पदाधिकारी आहे. याशिवाय त्याचे संबंध स्थानिक राजकारण्यांसोबत आहेत. त्याने त्याच्या पत्नीला एका राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवून महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते. याच ओळखीचा फायदा घेत, अनेकांना गंडवल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस या सर्व बाबींची कसून तपास करत असून, त्याच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी होण्याचीही शक्यता आहे.
भोंदू अरुण पाटीलचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत असून, त्याने दोन लोकप्रतिनिधींनाही गंडवल्याची माहिती समोर येत आहे. खानदेश आणि मराठवाड्यातील हे लोकप्रतिनिधी असून, त्यांची सुमारे सव्वादोन कोटींची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. हे दोन्ही लोकप्रतिनिधी मागील दोन वर्षापासून भोंदू पाटीलच्या संपर्कात होते. त्याने अघोरी विद्येच्या नावाने त्यांना गंडवल्याची माहिती समोर येत असून, पोलिस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत.