

नाशिक : बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या महिलेस गुन्हे शाखा युनिट (अंबड) च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल चार लाख 45 हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित गुन्हा उघडकीस आला आहे.
या प्रकरणात फिर्यादी अमित अशोक वाघमारे (38, रा. दिंडोरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ठक्कर बाजार बसस्थानकात पत्नी व मुलांसह बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 जानेवारी 2026 रोजी पोलिस अंमलदार सविता कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक महिला चोरीचे दागिने विक्रीसाठी पंचवटी परिसरात फिरत आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर गणेशवाडी फूलबाजार, पंचवटी येथे सापळा रचण्यात आला. पथकाने निर्मला विजय लोंढे (37, रा. तिरुपतीनगर, टाकळी रोड, नाशिक) हिला ताब्यात घेतले.
अंगझडतीदरम्यान तिच्याकडून मंगळसूत्र, कानातील टॉप्स, नेकलेस व कानवेल असा एकूण 4.45 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत तिने ठक्कर बाजार बसस्थानकात बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधून दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तपासात हीच चोरी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिटच्या पथकाने केली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव, चारूदत्त निकम व सविता कदम व तांत्रिक विश्लेषण विभागाच्या तारडे यांनी केली.