

नाशिक : सतीश डोंगरे
महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार तऱ्हेतऱ्हेचे फंडे वापरत आहेत. त्यातच ऐन मतदानाच्या एक दिवस अगोदर 14 जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण असल्याने, उमेदवारांसाठी ही मोठी संधीच असून, वाणातून मतांचे दान मागण्यासाठी मोठी तयारी सुरू झाली आहे. काही उमेदवार तर चांदीच्या वस्तूंचे वाण देणार असून, शहरातील काही सराफांना वाणाच्या वस्तूंची ऑर्डरदेखील देण्यात आली आहे. दरवाढीमुळे लिमिटेड लोकांसाठीच चांदीचे वाण असेल, अशीही माहिती समोर येत आहे.
नव्या वर्षात येणाऱ्या पहिल्याच मकरसंक्रांत या सणाला वाण देण्याची जुनी परंपरा आहे. यंदा ऐन निवडणुकीत संक्रांतीचा सण आल्याने, राजकारण्यांकडून त्याचा गोडवा वाढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषत: महिला उमेदवारांकडून हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून वाणातून अनेक भेटवस्तू मतदारांना देण्याचे नियोजन केले आहे.
काही उमेदवारांकडून चांदीच्या वस्तूंचे वाण देऊन मतदारांना आकर्षित केले जाणार आहे. त्यात जोडवे, वाटी, चक्री, ताट, ग्लास, नाणी, पैंजण, चांदीचे पेंडंट, ओम, स्वस्तिक, मोरपंख, कृष्णाची बासरी, नाणी, बर्फी आदी वस्तूंचा वाणासाठी वापर केला जाणार आहे. यंदा चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. यातील कोणतीही लाइट वेट वस्तू बनविण्यासाठी कमीत कमी 500 ते 700 रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे लिमिटेड मतदारांनाच वाणातून या वस्तू दिल्या जाण्याचे नियोजन केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी दोन लाख 53 हजार 900 रुपयांवर गेलेल्या चांदीचे दर काहीसे कमी झाले आहेत. सोमवारी (दि.5) चांदी प्रतिकिलो जीएसटीसह दोन लाख 47 हजार 710 रुपयांवर होती. मागील आठवड्यात चांदी दोन लाख 38 हजार इतकी खाली उतरली होती. चांदी दरातील काहीशी घसरण उमेदवारांच्या मदतीला धावून आल्याने, चांदीचे वाण खरेदीकडे उमेदवारांची पावले वळत आहेत.
या वस्तूंचे देणार वाण
जोडवे, वाटी, चक्री, ताट, ग्लास, नाणी, पैंजण, चांदीचे पेंडंट, ओम, स्वस्तिक, मोरपंख, कृष्णाची बासरी, नाणी, बर्फी आदी.
चांदीच्या चिन्हांची प्रतिकृती भेटवस्तू
तिकीटवाटपाच्या गोंधळात काही माजी नगरसेवकांसह बड्या उमेदवारांला पक्षाने डच्चू दिल्याने, ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या उमेदवारांसमोर निवडणूक आयोगाकडून प्राप्त चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान आहे. अशात चांदीच्या चिन्हांची प्रतिकृती वाणात देण्याचे काहींनी नियोजन केले आहे. जसे चावी, नारळ, शिट्टी, अंगठी, बासुरी, किटली आदी चिन्हांच्या चांदीपासूनच्या प्रतिकृती मतदारांना देण्याचे नियोजन केले जात आहे.
सोन्या-चांदीचे सोमवारी दर असे
1,41,110 - सोने : 24 कॅरेट प्रतितोळा
1,29,820 - सोने : 22 कॅरेट प्रतितोळा
2,47,710 - चांदी प्रतिकिलो
चांदी दरात मोठी वाढ झाल्याने, पाचशे रुपयांपासून पुढेच वाण म्हणून वस्तू घेता येणार आहेत. मकरसंक्रांतीला चांदीचे जोडवे देण्याची प्रथा असून, ती शुभ मानली जाते. लाइट वेट जोडवे कमीत कमी पाचशे रुपयांपासून पुढे आहेत.
चेतन राजापूरकर, संचालक, इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स