

वडवणी : सोशल मीडियावर आपल्या कलेने सर्वांची मने जिंकणाऱ्या वडवणी तालुक्यातील एका ऊसतोड कामगार जोडप्यावर काळाने घाला घातला आहे. लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या पतीच्या अंगावर ऊसाची ट्रॉली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गणेश डोंगरे (वय ३०, रा. सोन्नाखोटा, ता. वडवणी) असे मयत ऊसतोड मजुराचे नाव आहे.
गणेश डोंगरे हे पत्नी अश्विनी आणि तीन मुलांसह ऊसतोडणीसाठी लातूर जिल्ह्यातील कारखान्यावर गेले होते. दोन दिवसांपूर्वी ते आपली ऊसाची गाडी घेऊन कारखाना परिसरात थांबले होते. यावेळी त्यांची पत्नी अश्विनी या मोबाईलवर फेसबुक लाईव्ह करून परिसराची माहिती देत होत्या. व्हिडिओ सुरू असतानाच त्यांची नजर पतीकडे गेली आणि त्याच क्षणी गणेश यांच्या अंगावर ऊसाने भरलेली ट्रॉली कोसळली. यात गणेश यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मदतीचा ओघ
घटनेचे गांभीर्य ओळखून आ. धनंजय मुंडे यांनी डोंगरे कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच माजी आमदार केशवराव आंधळे यांनी गणेश यांच्या तिन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून त्यांना दत्तक घेतल्याचे जाहीर केले आहे. वडवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मदत फेरी काढण्यात येणार आहे