Nashik Winter Chill Fitness Health Awareness |गुलाबी थंडीने वाढवली आरोग्याची ओढ

जॉगिंग ट्रॅकवर नाशिककरांची गर्दी, पहाटेपासून व्यायामप्रेमींची लगबग
Nashik Winter Chill Fitness Health Awareness
Nashik Winter Chill Fitness Health Awareness
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वातावरणात गुलाबी थंडीची चाहूल लागताच नाशिककरांच्या दिनचर्येतही बदल होऊ लागला आहे. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मोकळी हवा, धुक्याची हलकी चादर आणि बोचऱ्या थंडीची सुखद अनुभूती घेत आरोग्य जपण्यासाठी नागरिक घराबाहेर पड्डू लागले आहेत. शहरातील विविध उद्याने, जॉगिंग ट्रॅक आणि मोकळ्या मैदानांवर सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता दिसून येत आहे.

नाशिकचे हवामान मुळातच आल्हाददायक मानले जाते. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीचा जोर वाढू लागल्याने पहाटेचे वातावरण अधिक प्रसन्न झाले आहे. सकाळी लवकर उठून चालणे, धावणे, योगासने, प्राणायाम आणि विविध प्रकारचे व्यायाम करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शहरातील जॉगिंग ट्रॅकवर पहाटे सहा वाजण्यापूर्वीच नागरिकांची वर्दळ सुरू होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. काही जण मित्रमंडळींच्या समूहासह चालण्यासाठी येतात, तर काही जण एकट्याने धावणे आणि वेगाने चालण्याचा व्यायाम करतात. ज्येष्ठ नागरिकांचेही स्वतंत्र गट उद्यानांमध्ये दिसून येत आहेत.

आरोग्यदायी दिनचर्येला चालना

थंडीच्या दिवसांत व्यायाम करताना मात्र योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी पहाटेच्या अतिथंड वातावरणात अचानक बाहेर पडण्याऐवजी शरीराची हालचाल करून मग व्यायाम सुरू करावा. योग्य उबदार कपडे परिधान करणे, पुरेसे पाणी पिणे आणि आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. नियमित व्यायामातून आरोग्य जपण्याचा संदेश देत गुलाबी थंडीने नाशिककरांना पुन्हा एकदा पहाटेच्या आरोग्यदायी दिनचर्येकडे वळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.