Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ संपेल, नाशिककडे काय उरेल?

Nashik Simhastha Kumbh Mela | २५ हजार कोटींचा खर्च की शहराचा कायापालट? नाशिक कुंभमेळ्याच्या भव्यतेमागील 'हे' प्रश्न ऐरणीवर
Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh Mela
Published on
Updated on

डॉ. राहुल रनाळकर
नाशिकच्या दाराशी सिंहस्थ कुंभमेळा उभा आहे. गोदावरीच्या घाटांपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत तयारीला वेग आला आहे. कोट्यवधी रुपयांची कामे, नवे आराखडे, प्रशासकीय बैठका आणि घोषणांचा धडाका सुरू आहे. या सगळ्या लगबगीत एक गोष्ट मात्र ठरवावी लागणार आहे. सिंहस्थासाठी उभारले जाणारे नाशिक हे केवळ काही महिन्यांच्या गर्दीला सामावून घेणारे शहर असणार की, पुढच्या अनेक दशकांचे भवितव्य घडवणारे शहर ठरणार?

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Shirdi Railway | नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सरळ की शिर्डीमार्गे? भूसंपादन अधिसूचनेमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम

कारण सिंहस्थ कुंभमेळा येईल, लाखो भाविक येतील, पर्यटन होईल आणि हा महाकुंभमेळा संपेलही; पण त्यासाठी खर्च होणारा पैसा, उभ्या राहणाऱ्या वास्तू आणि बदलणाऱ्या शहराचा चेहरा कायमचा नाशिककडे राहणार आहे. म्हणूनच आजचा खरा प्रश्न सिंहस्थ कुंभमेळा किती भव्य होईल हा नसून, सिंहस्थ संपल्यानंतर नाशिककडे काय उरेल? हा आहे.

नाशिकच्या आकाशात सध्या सिंहस्थाची चाहूल स्पष्टपणे जाणवत आहे. गोदावरीच्या घाटांपासून त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तापर्यंत, रस्त्यांपासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत आणि प्रशासनाच्या बैठकांपासून धार्मिक कार्यक्रमांपर्यंत सिंहस्थाची तयारी आता केवळ कागदावर राहिलेली नाही. दि. २८ ते ३० ऑगस्टदरम्यान नाशिकमध्ये झालेला 'कुंभ मंथन संगम' हा या तयारीतील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नांदीचा भाग ठरला. त्याच वेळी दि. ३१ मार्च २०२७ रोजी होणाऱ्या ध्वजारोहणापूर्वी विविध पायाभूत कामे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत; मात्र या सगळ्या गडबडीत एक प्रश्न नाशिककरांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा संपल्यानंतर नाशिककडे काय उरणार? हा प्रश्न सिंहस्थाच्या धार्मिक महत्त्वाला कमी करणारा नाही. उलट, सिंहस्थाचे खरे महत्त्व समजून घेणारा आहे. कारण लाखो - कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा हा सोहळा नाशिकसाठी केवळ काही दिवसांचा धार्मिक उत्सव नाही, तो शहराच्या पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्था, पर्यटन, वाहतूक, पर्यावरण आणि भविष्यातील नागरी नियोजनाला दिशा देणारी मोठी संधी आहे.

सिंहस्था कुंभमेळ्यानिमित्त सरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असते. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घाट, रेल्वेस्थानके, सार्वजनिक स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेवर काम सुरू आहे. गोदावरीकाठच्या घाटांची क्षमता वाढवण्याच्या योजना आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात नवीन घाट उभारण्याचे कामही नियोजित आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, सिंहस्थ हा नाशिकच्या पायाभूत विकासासाठी मोठा आर्थिक आणि प्रशासकीय उत्प्रेरक ठरू शकतो; पण संधी आणि खर्च यात फरक असतो. खर्च झाला म्हणून विकास झाला असे मानता येत नाही.

विकास तेव्हा झाला असे मानता येईल, जेव्हा सिंहस्थाची गर्दी ओसरल्यानंतरही त्या खर्चातून निर्माण झालेल्या सुविधा नाशिककरांच्या आयुष्यात कायमस्वरूपी उपयोगी पडतील. आज नाशिकसमोर हाच कळीचा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सिंहस्थाच्या खर्चावरून राजकीय वादही उफाळून आला आहे. २९ ऑगस्टला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिंहस्थाच्या विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला आणि २५ हजार कोटींच्या उधळपट्टीचा आरोप केला. त्यांनी सरकारकडून खर्चाचा हिशेब आणि पारदर्शकतेची मागणी केली.

या आरोपांची सत्यता तपासणे ही स्वतंत्र यंत्रणांची जबाबदारी आहे. कोणत्याही राजकीय नेत्याने केलेले आरोप म्हणजे अंतिम सत्य नव्हे आणि कोणाच्याही सरकारने केलेले योजना म्हणजे पाठोपाठ गैरव्यवहारच कायम असेही नव्हे; पण राजकारणाच्या आरोपांमुळे महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्न मात्र निर्माण होतो. सिंहस्थाच्या नावाने खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा हिशेब नाशिककरांना मिळणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन द्यावे लागेल. कारण हा पैसा कोणत्या ही एका पक्षाचा नाही. तो जनतेचा आहे.

सिंहस्थासाठी किती निधी मंजूर झाला? त्यापैकी किती खर्च झाला? कोणत्या कामासाठी किती निविदा निघाल्या? कोणत्या कंत्राटदाराला काम मिळाले? कामाची गुणवत्ता कोण तपासणार? काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी कोणाची? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंहस्थ संपल्यानंतर त्या सुविधांचा उपयोग कसा होणार? हे प्रश्न विचारणे म्हणजे सिंहल्लाला विरोध करणे नव्हे.

उलट, सिंहस्थाच्या पावित्र्याला आणि जनतेच्या पैशाला न्याय देणे आहे. नाशिकला सिंहस्थामुळे काय मिळाले हवे, याचा विचार करताना, राहणाऱ्या आजच्या समस्यांकडे पाहणे आवश्यक आहे. नाशिकची वाहतूक व्यवस्था आजही अनेक ठिकाणी ताणली जाते. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे. पावसाळ्यातील पाणी निचरा, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, सार्वजनिक वाहतूक आणि शहर नियोजन यांसारखे प्रश्न आजही नाशिककरांच्या रोजच्या जिवाचा भाग आहेत.

सिंहस्थाच्या काळात लाखो भाविक येणार असतील, तर या समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. सिंहस्थानिमित्त जर नवीन रस्ते बांधले जात असतील, तर त्यांची टिकऊ क्षमता एवढी हवी की, ते सिंहस्थ संपल्यानंतरही नाशिकच्या वाहतुकीला उपयोगी पडले पाहिजेत. जर घाट बांधले जात असतील, तर ते केवळ सणांच्या दिवशी लाखो भाविकांना सामावून घेणारे नसून, पुढील अनेक दशकांपर्यंत सुरक्षित आणि सुस्थितीत राहिल पाहिजेत.

जर मलनिस्सारण व्यवस्था सुधारली जात असेल, तर तिचा फायदा शहराच्या नदीपात्राला मर्यादित राहता कामा नये. जर रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण होत असेल, तर ते केवळ भाविकांसाठी नव्हे, तर नाशिकच्या नागरिकांसाठी आणि पर्यटन - व्यवसायासाठी कायमस्वरूपी उपयुक्त ठरले पाहिजे. जर गोदावरीच्या प्रवाहासाठी व्यवस्था केली जात असेल, तर ती केवळ अमृतस्नानाच्या दिवसांसाठी नको, गोदावरी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही ठेवण्याची दीर्घकालीन व्यवस्था हवी. सिंहस्थाच्या नावाने निर्माण होणारी प्रत्येक सुविधा 'सिंहस्थाची' न राहता 'नाशिकची' झाली पाहिजे.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Shirdi Railway Land Acquisition: काकोडकर समितीचा अहवाल येण्यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाची हालचाल; नाशिक रोड-शिर्डी मार्गासाठी भूसंपादन सुरू!

याच खरी कसोटी आहे. सिंहस्थाकडे केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून पाहणेही तितकेच अपुरे आहे. नाशिकच्या अर्थव्यवस्थेला ती मोठी चालना देऊ शकते. हॉटेल, वाहतूक, पर्यटन, धार्मिक साहित्य, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, हस्तकला, सेवा उद्योग आणि लघुउद्योग यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. राज्य सरकारने सिंहस्थाला पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याच्या दिशेनेही नियोजन केले आहे. मग प्रश्न असा आहे की, सिंहस्थाच्या गर्दीतून नाशिकच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला किती फायदा मिळणार?

भाविक नाशिकला आले, स्नान केले, दर्शन घेतले आणि परत गेले, एवढ्यावर सिंहस्थाची आर्थिक क्षमता संपता कामा नये. नाशिकचा क्राफ्ट उत्पादक, वाइन उद्योग, स्थानिक खाद्यसंस्कृती, हस्तकला, पर्यटनस्थळे, पर्यटनउद्योग, टॅक्सीचालक, हॉटेल व्यावसायिक, फूलविक्रेते, धार्मिक साहित्य विक्रेते आणि असंख्य छोटे व्यावसायिक या महाकुंभाच्या वर्तुळात सहभागी झाले पाहिजेत. सिंहस्थामुळे बाहेरच्या मोठ्या कंपन्यांना संधी मिळेल; पण स्थानिक नाशिककर उद्योजक या संधीचे किती भागीदार असतील, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

सिंहस्थाच्या नियोजनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची चर्चा आहे. गर्दीचे व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल नियंत्रण व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन प्रतिसाद यांसारख्या आधुनिक पद्धतींचा वापर करण्याचा प्रयत्न होत आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. पण तंत्रज्ञानाचा वापर केवळ सिंहस्थ संपेपर्यंत न राहता, नाशिकच्या कायमस्वरूपी प्रशासनात उतरला पाहिजे. सिंहस्थात वापरलेली वाहतूक नियंत्रण व्यवस्था पुढे शहराच्या वाहतुकीसाठी वापरता येईल का?
गर्दी व्यवस्थापनासाठी उभारलेले डिजिटल तंत्रज्ञान पुढे मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयोगी पडेल का? आपत्कालीन आरोग्य यंत्रणेची क्षमता वाढली, तर ती नंतर नाशिकच्या नागरिकांसाठी वापरली जाईल का? हे प्रश्न आज विचारले, तर ती नगर नाशिक अधिक सक्षम होईल. सिंहस्थाची तयारी करताना आघाडी एक मुद्दा विसरता कामा नये, तो म्हणजे गोदावरी.
नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळ्याची आत्मा गोदावरी आहे.

श्रीमत्प्रतीक आहे. त्र्यंबकेश्वरचा कुशावर्त आहे. त्यामुळे गोदावरीचे संवर्धन ही सिंहस्थाच्या तयारीतील एखादे पूरक काम नसून, त्याचे केंद्रस्थान असायला हवे. नदीकाठचे घाट सुंदर झाले, प्रकाशयोजना झाली, गर्दी व्यवस्थापन झाले; पण नदी प्रदूषितच राहिली, तर त्या विकासाचा अर्थ काय? भाविकांसाठी नदी स्वच्छ ठेवणे आणि नाशिककरांसाठी नदी वाचवणे यात फरक नसावा. सिंहस्थानिमित्त गोदावरीसाठी जर कायमस्वरूपी जलव्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, नदीकाठ संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणाची मजबूत व्यवस्था उभी राहिली, तर तो सिंहस्थाचा नाशिकला मिळालेला सर्वांत मोठा वारसा ठरेल.

आज सिंहस्थाच्या नावाने मोठ्या घोषणा होत आहेत. मोठे आराखडे आहेत. मोठ्या निधीची चर्चा आहे. मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. हे सर्व आवश्यकही आहे; पण मोठ्या सोहळ्याची खरी प्रतिष्ठा त्याच्या भव्यतेत नसते, ती संपल्यानंतर मागे काय ठेवते, यात असते. कुंभमेळ्याच्या काळात जगाचे लक्ष नाशिककडे असेल. लाखो भाविक येतील. देशभरातून माध्यमे येतील. नाशिकचे दर्शन जगाला होईल. त्या वेळी नाशिकने फक्त गर्दीचे व्यवस्थापन केलेले शहर म्हणून दिसू नये, ते नियोजनबद्ध, स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणपूरक, आधुनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर म्हणून दिसले पाहिजे.

सरकारने या प्रकल्पात केवळ कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवू नये. पारदर्शकता, गुणवत्ता आणि दीर्घकालीन उपयोगिता ही तीनही उद्दिष्टे साध्य करावीत. विरोधकांनीही केवळ आरोप न करता प्रत्येक कामाच्या तथ्याधारित हिशेब जनतेसमोर ठेवण्याची मागणी करावी. प्रशासनाने माहिती सार्वजनिक करावी. नागरिकांनी प्रश्न विचारावेत. माध्यमांनी कामांची तपासणी करावी. कारण सिंहस्थ कोणत्या ही एका पक्षाचा नाही. तो नाशिकचा आहे. म्हणूनच सिंहस्थाच्या नावाने खर्च होणारा पैसा, उभ्या राहणाऱ्या सुविधा आणि घेतलेले निर्णय यांपैकी कोणत्या ही एक सरकारी मालमत्ता नसून, नाशिकच्या पुढच्या पिढ्यांचा वारसा आहेत.

३१ ऑक्टोबरला सिंहस्थाची औपचारिक नांदी होईल, त्यानंतर नाशिकमध्ये श्रद्धेचा महासागर उसळेल; पण त्या महासागराची लाट ओसरल्यानंतरही जर नाशिकच्या रस्त्यांवर विकास दिसला, गोदावरीत स्वच्छता दिसली, वाहतूक शिस्त दिसली, पर्यटनाला वाव दिसला, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळाले आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा दिसली, तर सिंहस्थ आला, गेला नाही; तो नाशिकच्या भवितव्यात कायमचा उतरला, असे म्हणता येईल.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Ring Road | नाशिक रिंग रोडचे काम तुर्तास स्थगित! इंदिरानगरमधील शेतकरी ठिय्या आंदोलनाला अखेर यश

नाशिकच्या विकासाची परीक्षाही

सिंहस्थानिमित्त नाशिकचे ब्रँडिंग झाले पाहिजे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे नाशिकचे भवितव्य घडले पाहिजे. त्यामुळे 'सिंहस्थासाठी किती खर्च होणार?' एवढाच प्रश्न नाही, तर 'या खर्चातून नाशिकला किती कायमस्वरूपी मूल्य मिळणार?' रस्ते किती किलोमीटर झाले, यापेक्षा ते दीर्घकाळ सुस्थितीत राहतील का? घाट किती बांधले यापेक्षा गोदावरी किती स्वच्छ झाली?

किती भाविक आले यापेक्षा त्यातून नाशिकच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला किती बळ मिळाले? किती कोटी खर्च झाले, यापेक्षा त्या प्रत्येक कोटीमागे किती सार्वजनिक मूल्य निर्माण झाले? आणि किती मोठा सोहळा झाला, यापेक्षा सिंहस्थ संपल्यानंतर नाशिक किती मोठे झाले, हा अंतिम मापदंड असला पाहिजे. सिंहस्थ हा नाशिकच्या श्रद्धेचा उत्सव आहेच; पण तो नाशिकच्या विकासाची परीक्षाही आहे.

१० Human-Interest & SEO Headings:

  • सिंहस्थ संपेल, नाशिककडे काय उरेल? कुंभमेळ्याच्या निधी अन् विकासावर डॉ. राहुल रनाळकरांचा विशेष लेख.

  • .

  • गोदावरीची स्वच्छता अन् वाहतूक नियोजन; सिंहस्थानिमित्त नाशिककरांना मिळणार का कायमस्वरूपी वारसा?

  • ३१ मार्च २०२७ ध्वजारोहणापूर्वी नाशिकची धावपळ; पायाभूत सुविधा टिकाऊ असणार का?

  • सिंहस्थ कुंभमेळा: केवळ गर्दी व्यवस्थापन की नाशिकच्या अर्थव्यवस्थेला मिळणार नवा 'बूस्टर'?

  • 'खर्चाचा प्रत्येक रुपया नाशिककरांच्या उपयोगाचा असावा'; कुंभमेळ्याच्या नियोजनावर थेट भाष्य.

  • स्थानिक व्यवसाय, हॉटेल अन् पर्यटनाला कुंभमेळ्याचा किती फायदा? नाशिकच्या विकासाची परीक्षा.

  • गोदावरी नदीचे संवर्धन हेच सिंहस्थाचे केंद्रस्थान; प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा.

  • एआय (AI) अन् डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केवळ सिंहस्थापुरता की नाशिकच्या भविष्यासाठी?

  • पुढारी सह्याद्रीचा माथा: कुंभमेळ्याच्या राजकारणापलीकडे जाऊन नाशिकच्या भवितव्याचा विचार आवश्यक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news