

We need an all-inclusive stance regarding reservation: Sharad Pawar
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात मराठा आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे, यात सर्वांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. सरकार म्हणून 'हे याच्यासाठी, ते त्याच्यासाठी' असे वागणे योग्य नाही. आज वेगवेगळ्या समाजांच्या समित्या नेमल्या जात आहेत. मात्र, सरकार हे एका जातीचे किंवा समाजाचे नसून सर्वांचे आहे. पण ती एका जातीपुरती मर्यादित नको, असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला लगावला.
रविवारी (दि. १४) पक्षाचे एकदिवसीय अधिवेशन झाले. या अधिवेशनप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून मराठा आरक्षण, ओबीसी मराठा संघर्ष, सामाजिक ऐक्य ते पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यापर्यंत अनेक मुद्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कांदा निर्यातबंदीसह शेतमालाचे अनेक प्रश्न अजूनही केंद्र सरकारकडून सुटलेले नाहीत. नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा निघणार आहे, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली. 'ते गेले, ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांची मागणी होत होती,' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्याबाबत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला, तर जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. या आरोपावर पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, त्याचा आमचा कवडीचाही संबंध नाही. त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. ते सत्यावर आधारित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य नको, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, एका जातीचे राजकारण आम्हाला जमत नाही. समाजात अंतर वाढेल अशी विधाने करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी भुजबळांना अप्रत्यक्ष टोला लगावला.