

Nashik-Delhi now has daily flight service: MP Bhaskar Bhagre
जानोरी : पुढारी वृत्तसेवा नाशिकहून दिल्लीसाठी आठवड्यातून तीनच दिवस सुरू असलेली विमानसेवा १६ दि. सप्टेंबरपासून दररोज राहणार आहे, तर दि. २६ ऑक्टोबरपासून रात्रीदेखील दिल्लीसाठी सेवा सुरू होणार असल्याची माहिती खा. भास्कर भगरे यांनी दिली.
नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असताना, आठवड्यातून तीनच दिवस सेवा असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. याबाबत खा. भगरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन रेड्डी यांची भेट घेत दिल्लीसाठी दररोज व सायंकाळच्या वेळी एक फेरी सुरू करण्याची मागणी केली होती.
या शिवाय सिंहस्थ पर्वणीसाठी अतिरिक्त टर्मिनसचे काम सुरू करावे, जोडणारी विमानसेवा सुरू करावी आदी मागण्या केल्या होत्या. या मागण्यांची दखल घेत १६ पासून दिल्ली फेरी नियमित सुरू होत असून, २६ ऑक्टोबरपासून अतिरिक्त एक दिल्ली परतीची थेट फेरी सुरू होत आहे. त्यासोबतच दि. २६ ऑक्टोबरपासून बंगळुरू, हैदराबाद, इंदूर गोव्यासाठी विमान फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.