

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमानात घट झाल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. एल निनोचा प्रभाव वर्षभर राहणार असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्टपर्यंत काटकसरीने व नियोजनबद्ध व्यवस्थापन करत पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत ५ ऑक्टोबरला शासन निर्णय जाहीर झाला आहे.
३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत विविध तिथींना होणारे अमृतपर्व स्नान आणि २ ऑगस्टला पहिले शाही, ३१ ऑगस्टला कुंभमेळ्याच्या मुख्य स्नानावर मर्यादा येणार आहे. नदी बारमाही प्रवाहित राहावी म्हणून गौतमी - बेझे धरणातील पाणी आणून सोडण्यात येणार आहे. या योजनेसाठी पाण्याचा उपसा होणार आहे. त्यात ओहळ, भुयारी गटारीचे काम करताना मूळ स्रोत अडवले गेले आहेत.
सर्व तलावांचे काम राज्य पुरातत्त्व विभाग करत आहे. त्यातील पाणीसाठा उपयोगाचा नाही. शहरात झालेल्या यांत्रिक खोदकामाने भूस्तर सरकले आहेत. विहिरी आणि आड यांचे उपजत स्रोत बंद पडले आहेत. त्यामुळे दुष्काळाचे चटके जाणवणार आहेत.
कुंभमेळा हा तेरावा महिना आला आहे, अशी भावना नागरिकांत झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस ध्वजारोहण होणार आहे. तेव्हा लाखो भाविक येतील, असे सांगण्यात येते. या भाविकांना किती पाणी लागेल याचा विचार होणे आवश्यक आहे. यापुढील आठ महिने पाण्याची उधळपट्टी होणार आहे.
अहिल्या धरणाचा साठा वाढण्याऐवजी कमी:
यंदा गौतमी धरण भरले नाही. कुशावर्तात दर चार दिवसाला पाणी बदलले जाते. खासगी कंपनीच्या सीएसआर फंडातून होत असलेले जलशुद्धीकरणाचे काम कितपत यशस्वी होईल याबाबत साशंकता आहे. कुशावर्तात ९ लाख लिटर पाणीसाठा गंगासागर तलावातून भरला जातो.
सिंहस्थ उपसा योजना कार्यान्वित होईपर्यंत गंगासागर तलाव रिकामा झालेला असेल. ३१ ऑक्टोबरला सिंहस्थ ध्वजारोहण झाल्यानंतर कुशावर्तावर भाविकांची गर्दी होणार आहे. अहिल्या धरणावर मागच्या दोन वर्षांत साडेचार कोटी रुपये खर्च झाले. मात्र, पाणीसाठा वाढण्याऐवजी कमी झाला आहे. यावर्षी हे धरण कोरडेठाक पडणार यात शंका नाही. गंगासागर तलावातही कमी साठा आहे.
समिती गठीत:
सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. सिमेंट काँक्रीट रस्ते, निवासी इमारती आणि इतर विकासकामांसाठी पाणी लागणार आहे. यावर्षी उष्णता जास्त असल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होईल, पाण्याचा जपून वापर करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. जलसंकटावर ते कशी मात करतात, हे लवकरच स्पष्ट होईल. विकासकामांना कात्री लावल्यास व आवश्यक कामे केल्यास पाणीबचत शक्य आहे. दुष्काळात होरपळत असताना पाण्याचा उपसा करणे आणि शाही थाटात स्नान करणे ही चंगळ मानवतेला शोभा देणारी नाही.