दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; यंदाच्या कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्यांच्यासमवेत मानाचा वारकऱ्याचा मान नाशिक जिल्ह्यातील माळेदुमाला येथील बबनराव विठोबा घुगे (७५) आणि पत्नी वत्सला यांना मिळाला असून, गत १२ वर्षांपासून न चुकता केलेल्या कार्तिकवारीचे फळ आपणास विठुरायाने दिल्याची बोलकी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
कार्तिक एकादशीनिमित्त राज्यभरातील वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने जातात. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो, तर कार्तिक एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. याचवेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून एका वारकरी दाम्पत्याला मान मिळतो. तो त्या दाम्पत्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. हा सर्वोच्च आनंदाचा क्षण दिंडोरी तालुक्यातील घुगे दाम्पत्याला अनुभवयास मिळाला आहे.
यंदाच्या कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील घुगे कुटुंबाला मिळाला आहे. नाशिकपासून साधारणपणे ५० किलोमीटर अंतरावरील माळेदुमालाची लोकसंख्या साधारण तीन साडेतीन हजारांच्या आसपास आहे. येथील बबनराव विठोबा घुगे हे पत्नी वत्सलासोबत गेल्या १२ वर्षांपासून न चुकता वारी करतात. त्यांचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे. गहू, हरभरा, भाजीपाला अशी पिके घेऊन ते शेती करतात. मात्र २००३ पासून त्यांची दोन्ही मुले शेती सांभाळत आहेत. वणी परिसरात सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह माळेदुमाला येथे गेल्या १३ वर्षांपासून भरतो. त्यात बबनराव यांचा हिरिरीने सहभाग असतो. प्रत्येक त्र्यंबकवारीला ते जातात, तर आषाढीला नगर येथून पायी पंढरपूरला शिवनई वरवंडी येथील ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडीत सहभागी होतात.
कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय पूजेत मानाचा वारकरी होण्याचा मान आजपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही वारकऱ्यास मिळालेला नाही. बबनरावांच्या रूपाने नाशिक जिल्ह्यालाही हा पहिलाच मिळालेला मान असून, आपण धन्य झालो, अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :