Vidhan Parishad Election 2024 | किशोर दराडेंना महायुती, तर संदीप गुळवेंना आघाडी देणार साथ?

किशोर दराडे, संदीप गुळवे
किशोर दराडे, संदीप गुळवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्जप्रक्रिया शुक्रवारी (दि. ३१) सुरू झाली. विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेमध्येही पक्षाचे बलाबल वाढावे, यासाठी राज्यातील प्रमुख पक्ष उमेदवार आपल्या गळाला लावण्याचे काम करत आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवलेले विद्यमान आमदार किशोर दराडे हे शिंदे सेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आ. दराडे यांनी स्पष्ट करताना, सध्या तरी प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, कोणता पक्ष आमच्या पाठीशी उभा राहणार असेल, तर आमची स्वीकारण्याची तयारी आहे असे सांगितले, तर संदीप गुळवे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील सात विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ दि. ७ जुलै रोजी संपत आहे. त्यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण विभाग पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे व मुंबई विभागाचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने 10 दिवसांपूर्वी शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम पुढे ढकलला होता. आता हा कार्यक्रम जाहीर झाला असून, शाळा सुरू झाल्यावर २६ जूनला निवडणूक होणार असल्याने उमेदवारांना प्रचाराला सोपे वातावरण तयार झाले आहे.

दराडे यांनी गेल्या वेळी ही निवडणूक शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये विजय संपादन केला होता. गेल्या तीन वर्षांत राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यात सेनेतून शिंदेंचा गट बाहेर पडत भाजपला हात देत सत्ता स्थापन केली. तसेच राष्ट्रवादीचा अजित पवारांचा गट फुटून तेही सत्तेत सहभागी झाले. यामध्ये दराडे यांनी स्पष्टपणे उद्धव ठाकरे असो वा एकनाथ शिंदे असो कोणालाच उघडपणे पाठिंबा न देत सावध पावले उचलली होती. त्यामुळेच शिक्षक मतदारसंघात आ. किशोर दराडे हे शिंदे सेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत आ. दराडे यांनी स्पष्ट करताना, सध्या तरी प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, कोणता पक्ष आमच्या पाठीशी उभा राहणार असेल, तर आमची स्वीकारण्याची तयारी आहे. असे सांगितले आहे. तसेच जिल्ह्यातील दुसरे उमेदवार असलेल्या संदीप गुळवे यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळाल्याची चर्चा मतदारसंघात पसरली आहे.

पक्षीय बांधणी ठरणार मोठा फॅक्टर

किशोर दराडेंसह अन्य सात जण ही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने या निवडणुकीत रंगत येणार आहे. लोकसभेच्या मतदानानंतर लगेचच या निवडणुकीचे पडघम वाजले असल्याने या निवडणुकीत पक्षीय बांधणी हा मोठा फॅक्टर राहणार आहे. त्यातच अनेक राजकीय पक्ष हे उमेदवार आपल्या गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news