

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहुचर्चित टीसीएस महिला कर्मचारी शोषण आणि धर्मांतर प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, पीडितेचा ब्रेनवॉश करण्यासाठी थेट कट्टरवादी झाकिर नाईक याचे व्हिडिओ दाखविल्याची गंभीर बाब समोर येत आहे. प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खानविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, त्यात झाकिर नाईकच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय धर्मातरासाठी पीडितेला इस्लाम अॅप डाउनलोड करून देण्यात आले होते. तसेच ऑफिसच्या पैट्रीमध्ये तिच्यासमवेत अश्लील चाळेही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
२०२२ ते २०२६ या चार वर्षाच्या कालावधीत पीडितेवर झालेल्या अत्याचार आणि छळाचा संपूर्ण घटनाक्रम दोषारोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणात दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खान यांनी संगनमत करून पीडितेचे शोषण केले. आरोपींनी मिळून पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत तिचा छळ केला. या प्रकरणातील आणखी एक आरोपी मतीन पटेलवरही पोलिसांनी ठपका ठेवला असून, मुख्य आरोपी निदा खानची अटक टाळण्यासाठी तिला आश्रय दिल्याचा आरोप मतीनवर आहे.
आरोपींनी पीडित तरुणीला २०२२ मध्ये टीसीएस कंपनीत नोकरी मिळवून दिली होती. त्यानंतर हिंदू देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांनी पीडितेच्या धार्मिक भावना सातत्याने दुखावल्या. आरोपी दानिश शेखने पीडितेला लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्याशी वारंवार इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या जातीवरून अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर करून मानसिक छळ केला.
पीडितेचे धर्मांतर करण्यासाठी तिच्या मोबाइलमध्ये जबरदस्तीने इस्लाम धर्माचे विशेष अॅप डाउनलोड करून देण्यात आले. याशिवाय तिला सातत्याने इस्लाम धर्माशी संबंधित रील्स, व्हिडिओ आणि फोटो पाठवले जात होते. पीडितेला इस्लाम धर्माची पुस्तके वाचण्याची सक्ती करण्यात आली. तिच्या इच्छेविरोधात तिला बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडले गेले तसेच रोजा ठेवण्यासाठी तिच्यावर अतोनात दबाव आणण्यात आला. आरोपींनी पीडित हिंदू तरुणीचे नाव बदलून हनिया असे मुस्लीम नाव ठेवले होते. तिने नमाजपठण केले नाही, तर तिचे कुटुंबीय नरकात जातील, अशी भीती दाखवून तिचे मानसिक खच्चीकरण केले गेले.
पैंट्रीमध्ये विनयभंग; पैसेही लुबाडले
मुख्य आरोपी दानिशने केवळ पीडितेचे शारीरिक शोषण केले नाही, तर तिच्याकडून अत्यंत किमती वस्तू आणि मोठी रोख रक्कमही लुबाडली. तर दुसरा आरोपी तौफिक अत्तारने थेट ऑफिसच्या पैंट्रीमध्ये पीडितेचा विनयभंग करीत तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या संपूर्ण प्रकरणात नाशिक पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले आहेत.