

नाशिक : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन्ही पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तत्काळ निलंबित केले आहे. संबंधितांचे कृत्य पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
नाशिक शहरातील मुंबई नाका पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय एकनाथ गोडे व अतुल भुजंगराव क्षीरसागर यांना लाचखोरीप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तक्रारदार केतन भास्करराव पवार यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात अटकपूर्व जामिनासाठी मदत करण्याच्या बदल्यात दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा व स्वीकारल्याचा आरोप आहे. 10 जानेवारीस शासकीय विश्रामगृहात पंचासमक्ष सापळा रचण्यात आला.
या कारवाईदरम्यान खासगी व्यक्ती कल्पेश रमेश अहिरे याने पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे यांच्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रक्रियेत पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी मोबाइलद्वारे तक्रारदार व सहकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत लाच स्वीकृतीस प्रोत्साहन दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एकनाथ गंगाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचे वर्तन शिस्तप्रिय पोलिस खात्याला न शोभणारे, बेशिस्त व बेजबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 च्या उल्लंघनाबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
निलंबन काळात दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय नाशिक शहर नियंत्रण कक्ष येथे राहील. त्यांना दिवसातून दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक आहे. या कारवाईमुळे शिस्तभंग करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.