

सिडको : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने होत असलेल्या 30 हजार कोटींच्या कामांमुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलणार आहे. नाशिकला विकासाच्या ऐतिहासिक उंचीवर नेण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, असे नमूद करत प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या तपोवनात अयोध्येच्या धर्तीवर श्रीराम मंदिर उभारण्याची घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केली. सिडकोतील सर्वाधिक वर्दळीच्या त्रिमूर्ती चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी येत्या दीड वर्षात उड्डाणपुलाची उभारणी करण्याची ग्वाहीही महाजन यांनी दिली.
सिडकोतील पवननगर येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, भाजपचे उमेदवार दीपक बडगुजर, डॉ. योगिता हिरे, छाया देवांग, भूषण राणे, भाग्यश्री ढोमसे, साधना मटाले, प्रकाश अमृतकर, डॉ. वैभव महाले, शरद फडोळ, माजी नगरसेविका रत्नमाला राणे, प्रकाश चकोर, डॉ. संदीप मंडलेचा आदी उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 10 हजार कोटींच्या खर्चातून बाह्य रिंगरोडची उभारणी करण्यात येत असून, या माध्यमातून शहराच्या औद्योगिक, सांस्कृतिक व धार्मिक विकासाला चालना मिळणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये 30 हजार कोटींचे प्रकल्प उभे राहत आहेत. स्वच्छ व निर्मळ गोदावरीसाठी 2,200 कोटींचा प्रकल्प सुरू असून वर्षभरात विकासकामांना मोठा वेग येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तपोवन हे साधू-संतांचे स्थळ असून साधुग्रामच्या माध्यमातून त्यांच्या निवासाची सुसज्ज व्यवस्था करण्यात येणार आहे. साधुग्रामच्या जागेत वृक्षतोड केली जात असल्याचे आरोप चुकीचे आहेत.
मोठी झाडे न तोडता केवळ झुडपे हटविली जाणार आहेत. त्या बदल्यात 20 हजार झाडांची लागवड केली जात असून, त्यापैकी नऊ हजार झाडांची लागवड पूर्ण करण्यात आली आहे, असे महाजन यांनी सांगितले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांनी सिडको परिसरातील पाणीपुरवठा, ड्रेनेज व भूमिगत विद्युत व्यवस्था, तसेच त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाची गरज अधोरेखित केली. तर डॉ. अपूर्व हिरे यांनी नाशिकच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगत, शहराचा कायापालट करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना संधी द्यावी, असे आवाहन केले.
उद्धव- राज ठाकरेंवर टीकास्र
उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही महाजन यांनी टीका केली. विकासाची दृष्टी नसलेले लोक केवळ नकला करू शकतात. ते बघण्यासाठी त्यांच्या सभेला गर्दी होते. नागरिकांची करमणूक होते; परंतु त्यांना मतदान होत नाही. 288 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत उबाठाचे केवळ 20 आमदार आहेत. मनसेचा तर एकही आमदार नाही. आगामी मनपा निवडणुकीत त्यांचे दोन अंकी नगरसेवक निवडून येऊ शकत नाही, असा दावा महाजन यांनी केला.