

स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात थेट विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून, यामुळे या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे.
Trupti Desai allegation on neelam gorhe issue ashok kharat case
नाशिक : स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच आता या प्रकरणाला राजकीय रंग चढताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गो-हे यांच्यावर गंभीर आरोप करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
देसाई यांनी दावा केला की, नीलम गो-हे या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात होत्या आणि राजकीय फायद्यासाठी त्याला भेटत होत्या. 'इतर वेळी अनेक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या गोहे या आता खरात प्रकरणावर मौन का बाळगत आहेत?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच, नाशिकमधील कॉलेज रोडवरील खरातच्या कार्यालयात त्या वारंवार जात असल्याचा आरोपही देसाई यांनी केला आहे. यासोबतच, नाशिकमधील एक्स्प्रेस हॉटेलमध्ये तसेच पाथर्डी परिसरातील एका हॉटेलमध्येही दोघांची भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या भेटींच्या पार्श्वभूमीवर कोणते आर्थिक व्यवहार किंवा अन्य संबंध होते का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
आमदारकी व मंत्रिपदासाठीही गोहे या खरातला भेटत असल्याचा आरोप त्यांनी केला. देसाई यांनी पुढे म्हटले की, ज्या कार्यालयात महिलांवर अत्याचार झाल्याचे आरोप आहेत, त्याच ठिकाणी गो-हे जात होत्या. त्यामुळे या प्रकरणात त्यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून दोघांमध्ये ओळख असल्याचा दावाही त्यांनी केला.
या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणावर नीलम गो-हे यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास यंत्रणा या सर्व आरोपांची पडताळणी करणार का, याबाबतही उत्सुकता व्यक्त होत आहे.
नीलम गो-हे यांनी आरोप फेटाळले
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गो-हे यांनी दिले आहे. माझी आणि अशोक खरात याची कधीही भेट झालेली नाही. मी त्याला ओळखतही नाही, असे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. गोहे म्हणाल्या, मला अशा भोंदूकडे कधीही जाण्याची गरज नाही. तृप्ती देसाई यांनी जे आरोप केले आहे त्याबाबत त्यांनी पुरावे सादर करावेत. बिनबुडाचे आरोप करून बदनामी करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्याला आपल्याशी कुठल्याही प्रकाराचा संबंध आलेला नसल्याचे सांगत त्यांनी देसाई यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.