

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली असून, महिलांना शोषणाच्या जाळ्यात ओढण्यासाठी तो पेढा आणि संशयास्पद द्रव्याचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासातील माहितीनुसार, खरात महिलांना खाण्यासाठी पेढा आणि पिण्यासाठी खारट किंवा कडवट चवीचे पाणी देत असे.
हे पदार्थ सेवन केल्यानंतर महिलांना गरगरणे, मळमळ होणे तसेच डोके जड झाल्यासारखे वाटत असे. या अवस्थेत त्या अर्धवट शुद्धीत जाऊन आरोपीच्या प्रभावाखाली येत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तो कार्यालयातील लाइट बंद करून महिलांवर अत्याचार करत असल्याचा आरोप आहे.
या पेढ्यांमध्ये किंवा पाण्यात नेमके काय मिसळले जात होते, याबाबत आरोपीकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. फॉरेन्सिक तपासातून याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता असून, नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
तपास यंत्रणांकडून या द्रव्यांचा स्रोत, पुरवठादार तसेच त्यामागील साखळी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, खरात महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत असे.
कौटुंबिक तणाव, मूलबाळ न होणे, आर्थिक अडचणी किंवा वैवाहिक समस्या अशा कारणांमुळे आपल्या महिला त्याच्याकडे येत असत. त्यांचा विश्वास जिंकून तो त्यांना मानसिकदृष्ट्या प्रभावाखाली आणत असे. त्यानंतर 'विशेष विधी'च्या नावाखाली वारंवार शारीरिक संबंध ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे उघड झाले आहे.
भोंदूचे सहकारी, आर्थिक व्यवहाराची तपासणी सुरू
या प्रकरणात अनेक पीडित महिला पुढे येत असून, तपासाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. आरोपीने वापरलेल्या पद्धती, त्याचे संभाव्य सहकारी, आर्थिक व्यवहार तसेच डिजिटल पुरावे यांचा बारकाईने तपास सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे