

Trimbakeshwar's brother, who was presumed dead, came back to life
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अस्वली हर्ष येथे धक्कादायक घटना घडली आहे. अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच १९ वर्षीय तरुणाला अचानक खोकला आल्याने तो जिवंत असल्याचे समोर आले. या तरुणाचे नाव भाऊ सोमा लचके असे असून, सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
२ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास भाऊ लचके हा जव्हार रोडवरील सापगाव फाटा परिसरात दुचाकी घसरल्याने गभीर जखमी झाला. त्याच्या सोबत असलेला आणखी एक युवक किरकोळ जखमी झाला. नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत लचकेंना प्रथम त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र बेड शिल्लक नसल्याचे कारण देत त्याला दाखल करण्यात आले नाही.
यानंतर नाशिकच्या आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित करून नातेवाईकांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला गावी आणले व अंत्यविधीची तयारी सुरू केली.
सायंकाळी तयारी सुरू असतानाच भाऊला अचानक खोकला आला आणि हालचाल जाणवल्याने तो जिवंत असल्याचे लक्षात आले. तत्काळ त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया शक्य नाही, मात्र पर्यायी उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने भाऊ लचके ब्रेनडेड नसल्याचा निर्वाळा दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देताना नेमके काय कारण सांगितले गेले, याबाबत माहिती स्पष्ट झालेली नाही. या घटनेमुळे सर्वत्र तीव्र चर्चा रंगली असून, सर्वसामान्य गरीब रुग्णांसोबत घडलेला प्रकार हादरवून टाकणारा ठरला आहे.