

Inspection of Prasad Yojana works before Simhastha
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
साधू- महंतांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्यानंतर आता शासनस्तरावर आगामी सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी (दि. ५) सकाळी जिल्हाधिकारी जलज शर्मा व प्रांताधिकारी प्रणवदत्त यांनी त्र्यंबकेश्वर शहरातील केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याचा नवा आराखडा तयार करताना पूर्वीच्या कामांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच या कामांचा नेमका उपयोग कसा होऊ शकतो, हे पाहण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या पाहणी दौऱ्यात तहसीलदार श्वेता संचेती, पर्यटन विकास महामंडळाचे अभियंता महेश बागूल, नगर परिषदेचे अभियंता स्वप्निल काकड तसेच कामे करणाऱ्या स्पेक्ट्रम संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सन २०१६ मध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश प्रसाद योजनेत करण्यात आला.
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तब्बल २०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा तयार झाला. तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी या योजनेसाठी प्रयत्न करून निधी मंजूर करून घेतला. पहिल्या टप्प्यातील ५० कोटी रुपयांच्या कामांपैकी ३८.८१ कोटी रुपयांची कामे २०१९ मध्ये भूमिपूजनानंतर सुरू झाली. यात बहुमजली वाहनतळ, नारायण नागबली धर्मशाळा, तलावांचे सुशोभीकरण, अहिल्या घाट व चौकांचे सुशोभीकरण, दगडी रस्ते, भाविकांसाठी सुविधा केंद्र, बगीचे व ब्रह्मगिरी बेसमेंट कॅम्प या कामांचा समावेश होता. त्यानंतर ११ कोटी रुपयांचा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर परिसर विकास आराखडाही मंजूर झाला.
मात्र या कामांची सद्यस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे चित्र आहे. पूर्ण झालेली कामे नगर परिषदेच्या ताब्यात आलेली नाहीत. बहुमजली वाहनतळ कार्यान्वित असले, तरी देखभाल व स्वच्छतेचा अभाव आहे. तलावांचे सुशोभीकरण कागदोपत्री असून, प्रत्यक्षात इंद्राळेश्वर तलाव झाडाझुडपांनी झाकला गेला आहे, तर गौतम तलावाचे काम अपुरे आहे.
आणि भिंती पडून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. मंदिराच्या पश्चिम बाजूचा दगडी रस्ता, अहिल्या धरणासमोरील सुविधा केंद्र व तथाकथित ब्रह्मगिरी कॅम्प हे वापराअभावी ओसाड पडले आहेत. चौकांचे सुशोभीकरण अपूर्ण आहे, तर काही काही कामे मात्र पूर्णत्वाला गेली आहेत. प्रसाद योजनेतील कामांच्या खर्चाचे फलक शहरात ठिकठिकाणी लावले असले, तरी प्रत्यक्ष परिणाम दिसत नाही. या कामांचा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कितपत उपयोग होईल, हे पाहण्यासाठीच प्रशासनाने पाहणी दौरा केला. मात्र नागरिकांमध्ये या योजनेबद्दल निराशा असून, केंद्राचा हा प्रसाद नेमका कोणाच्या पदरात पडला याबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर परिसरातील काम शेवटच्या टप्प्यात आहे. गंगासागर बगिचाचे काम पूर्ण झाले तसेच नारायण नागबली धर्मशाळा वापरात आली आहे. तरी एकूणच प्रसाद योजनेतील कामांमुळे त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलेल ही अपेक्षा फोल ठरल्याचे नागरिक सांगतात.