

Meteorological Department Nashik News Orange Alert
नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (दि. ५) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगावसह नंदुरबार जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. विशेषतः नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाने नदी नाले भरून वाहत असून जिल्ह्यातील सर्वच धरणे भरली आहेत. तोरणमाळ घाटात दरड कोसळल्याने या भागाचा संपर्क खंडित झाला होता. तर अनेक वाड्या- वस्त्यांकडे जाणारे रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरू होती. सकाळी सुरू झालेल्या पावसाने दिवसभर रिपरिप सुरूच ठेवल्याने गोदावरीसह इतर नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातून २ हजार ३० वेगाने तर दारणा धरणातून ४ हजार ६०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे.
दिवसभराच्या पावसामुळे नाशिक शहरात जनजीवन विस्कळीत होते. नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहेत. दुर्गम भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने अनेक भागात संपर्क खंडित झाला आहे.
जिल्हाभारत आतापर्यंत झालेला पाऊस सरासरीच्या जवळपास ८३ टक्के झाला असून मध्यम आणि लघु प्रकल्प देखील शंभर टक्के भरून ओसंडू लागले आहेत. नवापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार, शहादा, आणि तळोदा या चारही शहरांमध्ये पावसाने दाणादाण उडाली आहे. अक्कलकुवा मोलगी रस्त्यावर तसेच नर्मदेकडील दुर्गम गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरा, कोरडी आणि देहली हे तीन मध्यम प्रकल्प १०० टक्के भरून वाहत आहेत. देवळीपाडा, डोंग, रंकानाला, नेसू, चिरडा, धनपूर, भुरी गव्हाण हे लघु प्रकल्प सुद्धा १०० टक्के भरले आहेत. धुळे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून पांजरानंदी दुथडक्ष भरून वाहत आहे. आक्कलपाडा प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पांजरानंदीमध्ये १८ हजार क्युसेक वेगाने विसर्ग केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. त्यामुळे दिवसभर सुर्यदर्शन होऊ शकले नाही. हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून १ हजार २७४ क्युसेक वेगाने तापी नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.