

नाशिकः त्र्यंबकेश्वर देवस्थानातील कथित 'व्हीआयपी दर्शन' घोटाळा प्रकरणात तपासाला वेग आला असून, मुख्य संशयित व देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम मधुकर कडलग यांच्या बँक खात्यांमध्ये गेल्या वर्षभरात तब्बल १ कोटी १३ लाख ५८ हजार रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या गंभीर खुलाशानंतर नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. व्ही. लाड यांनी सोमवारी (दि. २०) कडलग आणि सहसंशयित गोटीराम पेहरे यांची पोलिस कोठडी २४ एप्रिलपर्यंत चार दिवसांनी वाढवण्याचे आदेश दिले.
तपासादरम्यान कडलग यांच्या विविध बँक खात्यांत वेगवेगळ्या खात्यांमधून मोठ्या रकमा जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रकरणांत रोख रक्कम देऊन तीच रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून घेतल्याचेही समोर आले आहे. या व्यवहारांबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात अपयश आल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाचे सहायक संचालक किरण बेंडभर यांनी न्यायालयात मांडला. दरम्यान, पैसे घेऊन भाविकांना 'व्हीआयपी दर्शन' घडवून आणणाऱ्या एजंट आणि कडलग यांच्यात वारंवार फोनवरून संपर्क
झाल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या एजंटांच्या साखळीचा मागोवा घेण्यासाठी वाढीव कोठडी आवश्यक असल्याची मागणी पोलिस निरीक्षक व एसआयटीप्रमुख महेश कुलकर्णी यांनी केली. एसआयटीने आतापर्यंत २०० हून अधिक भाविकांची चौकशी केली असून, अनेकांनी एजंटमार्फत पैसे देऊन दर्शन घेतल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे परराज्यातील भाविकांनीही पुढे येत पोलिसांशी संपर्क साधला असून, त्यांच्यासमोरही संशयितांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
चार दिवसांत ७१ जणांना 'व्हीआयपी' प्रवेश
उत्तर गेटवरील नोंदवहीनुसार, दि. ३ ते ११ एप्रिलदरम्यान अवघ्या चार दिवसांत सुमारे ७१ भाविकांना कडलग यांच्या शिफारशींवरून मंदिरात प्रवेश देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या नोंदींमध्ये संबंधित भाविकांना 'नातेवाईक' किंवा 'पाहुणे' म्हणून दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष चौकशीत कडलग यांनी या भाविकांना ओळखत नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.
पैशांचा प्रवाह उलगडण्यावर भर
या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांतून संशयितांनी कोणती स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा शोध एसआयटी घेत आहे. बैंक व्यवहार आणि नोंदींचा मागोवा घेत उलगडण्यावर भर दिला जात आहे